आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांपासून घटतेय पावसाच्या ढगांची जाडी, 1961 मध्ये 47% ढग जाड होते, 2009 मध्ये 33%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय हवामान विभागाने या वर्षी सामान्य पाऊस होईल, अशी घोषणा केली आहे. देशभरात ९८% पाऊस होईल, असा अंदाज आहे. दुष्काळाशी झुंजणाऱ्या देशासाठी ही चांगली बातमी आहे. पण हवामान विभागाच्या (आयएमडी) एका अभ्यासाने ही चिंता वाढवली आहे. या अहवालानुसार, ५० वर्षांपासून पावसाळी ढगांची जाडी कमी होत चालली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस पाडणारे कमी उंचीचे ढगही कमी होत आहेत. त्यामुळे पाऊस कमी होत असून तापमान वाढत आहे.
 
भारतात प्रथमच ढगांची जाडी आणि कमी उंचीच्या ढगांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. आयएमडीचे निवृत्त वैज्ञानिक ए. के. जायसवाल यांच्या नेतृत्वात हा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, कमी उंची असणारे ढग मोठ्या प्रमाणात पाऊस पाडतात. १९६० ते २०१० च्या दरम्यान त्यात दर दशकात ०.४५% ची घट होत आहे. पण पावसाळ्याच्या हंगामात ही घट १.२२% ची आहे, ती चिंताजनक आहे. भारतात ७०% पाऊस जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळ्यातच होतो. दरवर्षी पावसाळ्यात ०.२३ दिवसांची घट होत आहे. म्हणजेच ५० वर्षांत पावसाळ्याचा एक दिवस कमी झाला. पावसाळ्याच्या एका दिवसात २.५५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होतो. ही घट देशाच्या प्रत्येक भागात नोंदली गेली आहे. या अभ्यासानुसार कमी उंचीचे ढग आणि पावसाचे दिवस यांत थेट संबंध आहे. ढग पातळ झाल्याने तापमानही वाढत आहे.
 
६१% केंद्रांत कमी उंची असणार ढग कमी आढळले आहेत. पावसाळ्यात सर्वात जाड ढग १९६१ मध्ये आढळले. त्या वेळी देशभरात त्यांचे प्रमाण ४६.७% होते, ते २००९ मध्ये घटून ३३.५%च राहिले.
 
... तर अंदाज लावणे शक्य होणार नाही
पृथ्वीचा ६०% पृष्ठभाग ढगांनी झाकलेला आहे. तो हवामान आणि तापमानात महत्त्वाची भूमिका बजावतो. सूर्यप्रकाश नियंत्रित करतो, किरणोत्सर्गाला पृथ्वीवर येण्यापासून रोखतो. पाऊस आणि बर्फवृष्टी करतो. पाणी-बाष्पाचे रूपांतर ढगांत करतो. त्यामुळे पाऊस पडतो. अशा प्रकारे जागतिक ऊर्जा नियंत्रित करतो. हवामानाचा अचूक अंदाज लावणाऱ्या ढगांचा सतत बदलणारा हा आकार हवामानाची अचूक भविष्यवाणी करण्यात अडचणी निर्माण करत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...