आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • There Is Lots Of Surveillance, But Theft Continue

घरांवर भरमसाट टेहळणी कॅमेरे, तरी चो-या सुरूच !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई/पाटणा/रायपूर - लहान शहरांमध्ये सुरक्षात्मक उपकरणांचा वापर वार्षिक १०० टक्के तर संपूर्ण देशात ३० टक्के दराने वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांनी त्याला प्राधान्य दिले असले तरी घरांची संपूर्ण सुरक्षा कोसो दूर आहे.

अत्याधुनिक सुरक्षा उपकरणातून ई-मेल, फोनवर सूचना देण्यासोबत सायरन वाजवून सतर्क केले जाते. मात्र चोरीच्या घटनांत घट झालेली नाही. तसेच चोरी पकडण्यातही फारसा उपयोग होताना दिसत नाही. चांगल्या दर्जाच्या कॅमे-यांचा अभाव हे त्यामागचे मुख्य कारण आहे. सुरक्षा उपकरणांची देखभाल नसणे आणि इंटरनेटला स्पीड मिळत नसल्यामुळे या सुविधेत व्यत्यय येत आहे.

भारतात सुरक्षा उपकरणांची निर्मिती होत नाही. त्यामुळे दर्जेदार उपकरणे मिळणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. ८० टक्के उपकरणे चीन, त्यानंतर कोरिया, अमेरिका आणि जर्मनीतून आयात होतात. अमेरिका आणि जर्मनीची उत्पादने महागडी असल्यामुळे लोक चिनी कॅमे-यांना प्राधान्य देतात. यात हवा तो दर्जा राखला जात नाही. चांगले सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे विशिष्ट व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.

सध्या घरांमध्ये सुरक्षात्मक उपायांचे प्रमाण ५ टक्के आहे. चिनी कॅमेरे २५०० रुपयांत येतात. थ्री मेगा पिक्सल आयपी सिरीज कॅमेरे ५० हजार रुपयांत येतात. ब-याचदा घटना कॅमे-यात कैद झाल्यानंतरही रिझोल्युशन कमी असल्याने संशयिताची ओळख ठरवणे कठीण जाते. एचडी कॅमे-याची क्षमता कमीत कमी १५ मीटरपर्यंत असायला हवी.

गेल्या तीन वर्षांत चार हजार पोलिस कर्मचा-यांना सायबर क्राइम प्रशिक्षण देणारे पोलिस रेडिओ ट्रेनिंग स्कूलचे संचालक वरुण कपूर म्हणाले, या उपकरणांमुळे सुरक्षा दलाच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र, यामुळे जोखीमही वाढते. कॅमे-यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा दिसतो, पण तो स्पष्ट दिसत नाही. संपूर्ण यंत्रणा इंटरनेट आणि विजेवर चालते. ते हॅक झाल्यास तुमचे खासगी व्हिडिओ किंवा गोपनीय व्यवसाय सर्वांना दिसू शकतो. अनेकदा व्यावसायिक यंत्रणा ठप्प होण्याचा धोका असतो. वीज नसल्यानंतर ही स्थिती ठरलेली असते.

अनेक्सी टेक्नॉलॉजीजचे सीईओ गोविंद अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, देशात याचा सर्वाधिक ८० टक्के उपयोग व्यावसायिक क्षेत्रात होत आहे. यामध्ये ज्वेलरी आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यापारात तो १०० टक्के होतो. सार्वजनिक ठिकाणे आणि वसाहतीमध्ये १५ टक्के आणि घरांत केवळ पाच टक्के आहे. लोक सेन्सरच्या साहाय्याने घरातील वीज, एसी किंवा अन्य उपकरणे बंद किंवा चालू करत आहेत. देशातील सर्वाधिक कर, मानक दर्जा नसणे आणि १०० टक्के आयातीवर अवलंबून राहणे हे बाजारपेठेतील आव्हान आहे. ग्राहकांना योग्य वस्तू मिळावी यासाठी या क्षेत्रात गुणवत्ता मानक निर्माण करणे आवश्यक आहे. सुरक्षा यंत्रणेत सर्वाधिक उपयोग सीसीटीव्ही कॅमेरा आधारित सिस्टिमचा आहे. बाजारात चार प्रकारचे सीसीटीव्ही (क्लोज सर्किट टेलिव्हिजन) कॅमेरे उपलब्ध आहेत. यामध्ये इनडोअर, आऊटडोअर, नाइट व्हिजन आणि वायरलेस कॅमे-याचा समावेश आहे. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे सल्लागार रक्षित टंडन म्हणाले, सुरक्षा उपकरणांची देखभाल आणि त्याची माहिती आवश्यक आहे. अन्यथा सिस्टिमचे कामकाज करू शकणार नाहीत. तुम्ही जिथे असाल तिथे इंटरनेट असेल तर मोबाइलवर, मेलवर त्याबाबत मिळालेला अलर्ट पाहता येईल. आमच्याकडे ब-याचदा अशी प्रकरणे आली, ज्यात मॉलमध्ये चोरीला गेलेली गाडी दिसली, मात्र झूम केल्यानंतर नंबर प्लेट दिसू शकली नाही. आता चांगल्या दर्जाचे कॅमेरे बाजारात आले आहेत. त्यांची किंमत कमी झाल्यास सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना ते परवडतील.

दावा-वस्तुस्थिती वर्षांपासून उपयोग होत असला तरी सुरक्षेबाबत समाधान नाही | 'दिव्य मराठी'ने यातील वास्तव समजावून घेतले...
1. केवळ निगराणीचा उपयोग होतो
गृहिणी व व्यावसायिक ज्योती गर्ग यांनी केवळ एका फोनवर स्वयंपाकघरात काम करणा-या मोलकरणीला फोनवर बोलण्याऐवजी काम करण्यास सांिगतले. ज्योती यांनी पाच वर्षांपासून घर, कार्यालय आणि कारखान्यात डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर बसवले आहे. त्यावर ३ लाख रुपये खर्चही केला. देखरेखीसाठी याचा फायदा होतो. मात्र, चोरी टाळण्यात फारसा उपयोग होत नाही.
2. तीन वर्षांत केवळ एक चोरी पकडण्यात आली
कंपनी संचालक हेमंत मेहतानी यांच्या घरी, गल्लीत आणि कारखान्यात तीन वर्षांपासून कॅमेरे आहेत. कॅमे-याचा प्रत्यक्षापेक्षा मानसशास्त्रीय फायदाच जास्त होतो. अनेक वेळा चोरी झाल्यानंतरही चोर पकडला जातो. संबंधित आरोपी स्त्री की पुरुष हे कॅमेरा सांगतो, मात्र योग्य ओळख पटत नाही. सुरक्षा रक्षकाकडून योग्य देखरेख होते.
3.नेट स्पीड मिळत नसल्यामुळे वापर होत नाही
२६ वर्षीय ब्यूटिशियन गुंजन दीक्षित यांना आपल्या घरी, दोन सलून व अकादमीत काय चालले ते मोबालवर दिसते.आठ कॅमेरे व व्हीएमआय लावण्यासाठी एकूण ८० हजार खर्च आला. मात्र, अनेकदा इंटरनेटला स्पीड मिळत नसल्यामुळे त्याचा वापर होऊ शकत नाही.

सद्य:स्थितीत सर्वाधिक प्रचलित सुरक्षा यंत्रणा
*सेन्सर आधारित सुरक्षा सिस्टिम : घराच्या मुख्य भागात सेन्सर लावले जातात. ते कंट्रोल पॅनलशी जोडलेले असतात. प्रोग्र्रॅमिंगनुसार घटनेनंतर फोन, मेल किंवा एसएमएस त्वरित मिळेल.
ही आहे कमतरता : ब-याचदा लहान प्राणी आला तरी अलर्ट वाजतो. चित्र दिसत नाही, ना रेकॉर्डिंग होते. केवळ अलर्ट घटना टाळू शकत नाही.
*व्हिडिओ रेकॉर्डर सिस्टिम : घरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे लावले जातात. आणीबाणीच्या स्थितीत उदा. सिस्टिम कंट्रोल पॅनलमार्फत थेट ३ छायाचित्रे काढून मेल केला जातो. याला व्हिडिओ रेकॉर्डर, नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर सिस्टिम म्हटले जाते.
ही आहे कमतरता : चांगला दर्जा नसणे आणि लांबच्या कॅमे-यामुळे योग्य चित्र दिसत नाही. आवाज येत नाही. इंटरनेट स्पीड नसेल तर सिस्टिम ठप्प होते.
*बायोमेट्रिक सिस्टिम - अटेंडन्स सिस्टिम, फेस रेकग्निझेशन सिस्टिमद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते. ज्याद्वारे बोटांचे ठसे, डोळे आणि चेह-याची नोंद होते.
ही आहे कमतरता : केवळ व्यक्तीची ओळख पटू शकते. कामाच्या ठिकाणी तो काय करतो ते दिसत नाही. केवळ व्यावसायिक वापरासाठी उपयोगी.