नवी दिल्ली - राष्ट्रवादाशी तडजोड कदापिही मान्य केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाने (भाजप)मांडली आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोनदिवसीय बैठकीचा समारोप रविवारी झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीत मांडल्या गेलेल्या राजकीय ठरावांबद्दल माहिती दिली.
या दोनदिवसीय बैठकीत राष्ट्रवादाचा मुद्दा सतत केंद्रस्थानी होता. शनिवारी बैठकीच्या उद्घाटनपर भाषणात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले होते. राष्ट्र आणि राष्ट्रवादावर हल्ला कदापिही सहन केला जाणार नाही, असा इशारा शहा यांनी दिला होता. जेटली म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद या दोन्ही गोष्टी एकत्रच नांदतात. घटनेनेही मत-मतांतरे किंवा एखाद्या विचारांशी असहमती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु देशाचे नुकसान करण्याचा अधिकार कुणाला नाही. "भारतमाता की जय'वरून निर्माण झालेल्या वादावर चर्चा झाली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा, या मुद्द्यावर चर्चा व्हायला नको, असा निर्णय सदस्यांनी घेतल्याचे जेटलींनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देवाचे वरदान असल्याचे वक्तव्य बैठकीनंतर व्यंकय्या नायडू यांनी केले. पत्रकारांनी राजनाथसिंह यांना विचारले असता राजकीय प्रस्तावात असे काही नव्हते, म्हणत त्यांनी विषय टाळला.
जनतेला कधीच आक्षेप नाही...
‘भारतमाता की जय’ला जनतेचा आक्षेप नाही हे कोलकात्यात भारताने सामना जिंकल्यानंतर शनिवारी सर्वांनी पाहिले, असे जेटली म्हणाले. त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. या देशातील प्रमुख विरोधी पक्ष स्थानिक पक्षांसोबत फरपटत असल्याचे ते म्हणाले.
फक्त धोरणांवरच बैठकीत विचार...
उत्तराखंडमध्ये काँग्रेसमधील बंडखोरी किंवा जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेचा पेच यावर चर्चा झाली नसल्याचे जेटली यांनी सांगितले. यासंबंधी पारित ठरावांत काश्मीरमध्ये सुुशासन ही कटिबद्धता व्यक्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.