आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता परिवाराची तिसरी आघाडी, सहा पक्ष विलिन, नवीन पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन दशके परस्परांवर कुरघाेडीचे राजकारण खेळणाऱ्या जनता दल परिवारातील सहा पक्षांचे बुधवारी विलीनीकरण झाले. आता नवीन पक्षाचे प्रमुख म्हणून मुलायमसिंह यादव काम पाहणार आहेत.

जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. तिसरी आघाडी स्थापन झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना आैपचारिक जाहीर केले. नवीन आघाडीचे नाव, चिन्ह, झेंडा इत्यादी बाबी ठरवण्याचा अधिकार सहासदस्यीय समितीस देण्यात आला आहे. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली आहे. एकेकाळचे राजकीय हाडवैरी नितीशकुमार, लालूप्रसाद यादव एकाच व्यासपीठावर दिसून आले. हा ऐतिहासिक निर्णय आहे. आमची एकजूट झाली आहे. आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो, असे मुलायम यांनी या वेळी बोलताना सांगितले. सहासदस्यीय समितीमध्ये एच.डी. देवेगौडा, प्रसाद, आेमप्रकाश चौटाला, शरद यादव, रामगोपाल यादव, कमल मोरारका यांचा समावेश आहे.

परिणाम नाही : भाजप
राज्यात याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तिसरी आघाडी स्थापन झाली असली तरी त्याचा काहीही परिणाम दिसून येणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी म्हटले आहे. ही तत्कालिक गरज म्हणून केलेली आघाडी आहे. त्याला कोणताही आधार नाही. खरे तर बिहारमधील जनतेला चांगले प्रशासन हवे आहे, विकास हवा आहे.

देशातील तिसरा मोठा पक्ष, ५ राज्ये, २ राज्यांत सरकार, १५ खासदार
नवीन पक्षाचा प्रभाव पाच राज्यांत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात पक्षाची सत्ता आहे. लोकसभेत १५ आणि राज्यसभेत जनता परिवाराचे ३० खासदार आहेत. अर्थात, भाजप आणि काँग्रेसनंतर देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सर्व पक्ष मिळून ४२४ आमदार आहेत. देशभरात भाजपचे १०२९ आणि काँग्रेसचे ९४१ आमदार आहेत.

काँग्रेसची साेबत घेऊनही सरकारसाठी डोकेदुखी ठरणार
जनता परिवाराचे राज्यसभेत ३० सदस्य आहेत. या खासदारांनी राज्यसभेत तृणमूलचे १२, डाव्या आघाडीचे ११ आणि बिजू जनता दलाच्या ७ सदस्यांना सोबत घेतल्यास त्यांची संख्या ६० होईल. अर्थात, राज्यसभेत कोणत्याही विधेयकाला रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. लालू-नितीश एकत्र लढल्यास फायदा होईल. तेच उत्तर प्रदेशातील विधानसभेत सपाच्या नेतृत्वाखाली जातीय मतांवर पकड निर्माण करता येणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, या आघाडीतील पक्षांचे राज्यांनुसार बलाबल..