आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Good Rain In Marathwada Skymate Weather Department

महाराष्ट्रासह देशभरात यंदा वरुणराजा पावणार, 106 टक्के पावसाचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांसाठी सुवार्ता आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल हाेईल आणि पाऊसही चांगला पडेल, असे हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. विशेषत: दुष्काळाचा प्रचंड फटका बसलेल्या मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. या अंदाजानुसार यंदा देशभरात १०६ टक्के पाऊस होईल.

स्कायमेट या खासगी संस्थेने सोमवारी जाहीर केलेल्या अंदाजात यंदा देशभरात १०५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा स्कायमेट आणि हवामान खात्याचे अंदाज जुळले आहेत. गेल्या वर्षी मात्र या दोघांचे अंदाज परस्परविरोधी होते. मागील वर्षी देशात १०२ टक्के पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. तर एप्रिल २०१५ मध्ये हवामान खात्याने देशभरात ९३ टक्के पावसाचे भाकीत केले होते. हेच प्रमाण हवामान खात्याने दुसऱ्या अंदाजात ८८ टक्क्यांवर आणले होते. तेव्हाही स्कायमेट देशात धो-धो पाऊस पडेल यावर ठाम होते. २०१५ मध्ये ८६ टक्केच पाऊस पडला. खात्याचा अंदाज खरा ठरला होता. स्कायमेटने नंतर माफीही मागितली होती. यंदा मात्र स्कायमेट आणि हवामान खात्याचा अंदाज सारखाच आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, मान्सूनची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) १०६ टक्के राहील. यंदाचा हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता ९४ टक्के असून साधारणपणे पावसाचे प्रमाण संपूर्ण भारतात सारखेच राहील. इशान्य भारत, विशेषत: तमिळनाडूमध्ये मात्र कमी पावसाचा अंदाज आहे.

एक जून ते सप्टेंबर २०१५ या काळात महाराष्ट्रातील पाऊस
विभाग पडलेला तूट
मराठवाडा ४१२.४ ४०%
विदर्भ ८४८.२ ११%
म. महाराष्ट्र ४८८.१ ३३%
कोकण २००५.० ३१%
(अाकडेवारी मिमीमध्ये)
हवामानाचा अंदाज मांडणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने सोमवारीच यंदा सरासरी १०५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. यानंतर भारतीय हवामान खात्यानेही याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. दरम्यान, हवामान खाते जूनमध्ये पुन्हा एकदा पुढील काळासाठी पावसाचा अंदाज वर्तवेल.यात जुलै ते ऑगस्ट या काळातील पावसाची शक्यता वर्तवली जाईल.सध्या देशभर केवळ शेतकरीच नव्हे तर अर्थतज्ज्ञांचेही पावसाच्या या अंदाजाकडे लक्ष होते. हवामान खात्याने पूर्वनियोजित वेळेच्या दोन आठवडे आधीच हा अंदाज मांडला आहे.
पुढे वाचा... असा पडेल सरासरीपेक्षा अधिक पाऊस... , मान्सूनच्या पावसाचे महत्त्व, हवामान खात्याचे यशस्वी मॉडेल