आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदाच्या कन्येला बलात्काराची धमकी, अभाविपवरील आरोपाने तापले राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील वादानंतर भाजपची विद्यार्थी शाखा अभाविपविरुद्ध सोशल मीडियावर ऑनलाइन मोहीमच छेडणाऱ्या कारगिल शहिदाची कन्या गुरमेहरला अभाविपने बलात्काराची कथित धमकी दिल्यानंतर हे प्रकरण चिघळले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ‘ या विद्यार्थिनीचे डोके कोण बिघडवत आहे?’ असा सवाल केला आहे. त्याला गुरमेहरने ‘ मला मेंदू आहे, त्यात कोणीही विष कालवत नाही, असे उत्तर दिले आहे.
 
‘देशातील विद्यापीठात ही विध्वंसकांची युती आहे’,  अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलीे. दोघांच्याही वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेस व आपने भाजप आणि आरएसएसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.  कारगिल युद्धात शहीद कॅप्टन मनदीप सिंह यांची मुलगी व लेडी श्रीरामकॉलेजची विद्यार्थिनी गुरमेहर कौरचे सोशल माडिया कॅम्पेन खूपच चर्चेत आले आहे.
 
त्यावर प्रतिक्रिया देताना रिजीजू यांनी ‘या विद्यार्थिनीचे डोके कोण बिघडवत आहे?’ एक भक्कम सैन्य कोणत्याही युद्धाला थोपवते. भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही, मात्र कमकुवत झाल्यावर भारतावर नेहमीच हल्ले झाले आहेत, असे ट्विट केले आहे. रिजीजू यांच्या या विधानावरून नवा वाद उफाळला आहे. एखादी महिला जेव्हा स्वतंत्रपणे विचार करते, तेव्हा पितृसत्ताक भाजपला तिचा मेंदू दूषित वाटू लागतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.
 
‘एका मुलीला सोशल मीडियावर बलात्काराची धमकी दिली जाते. भाजप व आरएसएसच्या एकाही नेत्याला त्यात काही चुकीचे वाटत नाही आणि ते त्याचा निषेधही करत नाहीत, का?’, असे ट्विट आपचे नेते आशुतोष यांनी केले आहेे. भाजप हा गुंड व गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. म्हैसूरचे भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या ट्विटवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात त्यांनी शहिदाच्या मुलीची तुलना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमशी केली आहे.
 
डीयू उत्तर कॅम्पसमध्ये अभाविपचा तिरंगा मार्च 
दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) उत्तर कॅम्पसमध्ये सोमवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा मार्च काढला. मार्चमध्ये सहभागी विद्यार्थी तिरंगा घेऊन रामजस कॉलेजपर्यंत गेले. देशविरोधी घोषणा देणारे विद्यार्थी व संघटनांविरुद्ध हा मार्च आहे. जेएनयूमध्ये जे झाले, ते डीयूमध्ये होऊ देणार नाही, असे अभाविपने म्हटले आहे.
 
गुरमेहरची आणखी एक पोस्ट चर्चेत 
गुरमेहरने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ‘पाकिस्तानने माझ्या वडिलांना मारले नाही. युद्धाने मारले आहे,’ असे म्हटले आहे. त्यावर क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग कार्ड धरून आपला एक फोटो शेअर केला आहे. त्यावर ‘ मी तिहेरी शतक ठोकले नाही, माझ्या बॅटने ठोकले आहे,’ असे लिहिले आहे.
 
गुरमेहरला संरक्षण देण्याचे अादेश
कारगिल शहिदाच्या मुलीने बलात्काराच्या धमकीनंतर दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.  अभाविपचे कार्यकर्ते आपणास बलात्कार व खुनाच्या उघड धमक्या देत आहेत, अशी तक्रार गुरमेहरने केली आहे. दिल्ली महिला आयोगाने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आणि गुरमेहरला संरक्षण देण्याचे आदेश दिल्ली  पोलिसांना दिले.
 
 
बातम्या आणखी आहेत...