आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - जम्मू प्रांतात गुरुवारी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी मनमोहनसिंग यांनी चर्चा करू नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. परंतु त्याला डाव्या पक्षांकडून विरोध करण्यात आला आहे. काँग्रेसने भाजपची मागणी फेटाळली तर पीडीपीने दहशतवाद्यांच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बंदुकीच्या वातावरणात पाकिस्तानसोबत चर्चा करण्यावर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी फेरविचार करावा. कारण अशा परिस्थितीत चर्चा करणे योग्य होणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. भारताच्या विरोधात पाकिस्तानातून करण्यात येणा-या दहशतवादी शक्तीचा गुरुवारच्या हल्ल्यामागे हात आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी म्हटले आहे.
सीमेपलीकडून घुसखोरी : गृहमंत्री शिंदे : जम्मूमध्ये आत्मघाती हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी केली होती, असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. गुरुवारी सकाळी दोन हल्ले झाले. एक पोलिस ठाण्यावर आणि दुसरा लष्करी छावणीवर झाला. चार दहशतवादी सीमेपलीकडून भारतीय हद्दीत घुसले व त्यांनी हा हल्ला केला, अशी प्राथमिक माहिती आहे, असे शिंदे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. सांबा भागात सायंकाळपर्यंत दहशतवादी व लष्कर यांच्यात चकमक सुरू होती, असे गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी सांगितले.
समस्या सोडवण्यासाठीच चर्चा : काँग्रेस
जम्मूमध्ये हल्ला झाला असला तरी पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली जाणार नाही. ही चर्चा दोन्ही देशांतील समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी स्पष्ट केले. दोन्ही देश दहशतवादाची शिकार झाले आहेत. त्यामुळे उभय देशांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध लढले पाहिजे. या हल्ल्याचा आम्ही धिक्कार करतो, असे सिंह म्हणाले.
दहशतवाद्यांच्या मनासारखे होईल
जम्मूमधील हल्ल्याची घटनेचा धिक्कार करतो. परंतु त्यामुळे सिंग-शरीफ यांच्यातील चर्चा थांबवणे चुकीचे होईल. काही पक्षांनी ही मागणी केली आहे. परंतु तसे करावे, हेच तर दहशतवाद्यांना वाटते. दहशतवाद्यांना हवे तेच यातून होईल, असे भाकपचे राष्ट्रीय चिटणीस डी. राजा यांनी म्हटले आहे. सीमारेषेवरून दोन्ही देशांतील संबंध चढ-उतार येऊ शकतात, असे राजा म्हणाले.
पंतप्रधानांचा बर्थडे सेलिब्रेशनला फाटा
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी गुरुवारी वयाच्या 81 व्या वर्षात पदार्पण केले. मात्र, जम्मूमधील हल्ल्यामुळे सिंग यांनी केक कापला नाही व वाढदिवसाचे कोणतेही सेलिब्रेशन केले नाही. ते फ्रँकफर्ट येथून वॉशिंग्टनला जात होते. जम्मूमधील हल्ल्याची बातमी कळल्यापासून विमानातील वातावरण उदासवाणे झाले होते.
सिंग यांचा विमानातील हा दुसरा वाढदिवस होता. गेल्या वर्षी विमानात वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा झाला होता.
30 पैकी 12 अतिरेक्यांना कंठस्नान : काश्मीर खो-यात लष्कराने घुसखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. केरन सेक्टरमध्ये 30 हून अधिक अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी घेरले असून 10-12 अतिरेकी मारले गेले आहेत. मंगळवारपासून ही कारवाई सुरू आहे. माछिल सेक्टरमध्येही बुधवारी अशीच कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अद्याप सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह दिसले आहेत.कारवाई संपल्यानंतरच दहशतवाद्यांचा नेमका आकडा सांगता येईल असे लष्करी सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.