आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणाचा आज फैसला, आंध्रात कडेकोट बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस कार्यकारिणीच्या मंगळवारी होत असलेल्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर 5 ऑगस्टपासून सुरू होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक पारित करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


काँग्रेस कार्यकारिणी तेलंगणाबाबत अंतिम निर्णय घेईल, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता बैठक सुरू होत असून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह यूपीएतील घटक पक्षांचे नेते बैठकीत चर्चा करतील. पक्षाचे आंध्र प्रदेश प्रभारी दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस देशहित लक्षात घेऊनच निर्णय घेईल, असे म्हटले आहे. दरम्यान, तेलंगणा निर्मितीला आंध्रात विरोध वाढत आहे.


1 हजार जवानांची अतिरिक्त तुकडी रवाना
राज्यात संवेदनशील भागांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलाचे 1 हजार जवान रवाना झाले आहेत. राज्यात आधीच 1200 जवान असून किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसह रायलसीमा भागात त्यांच्या तैनातीची शक्यता आहे. कर्नाटक व तमिळनाडूचे सशस्त्र दलाचे अनुक्रमे 200 व 100 जवान हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी 4 हजार जवान पूर्वीच राज्यात तैनात आहेत.


संयुक्त आंध्रचे समर्थक सरसावले
० विशाखापट्टणममध्ये आंध्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी काँग्रेस नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन केले.
० विजयवाडात खासदार एल. राजगोपालांच्या नेतृत्वाखालील लोकांना पोलिसांनी हुसकावून लावले.
० गोदावरी, श्रीकाकुलम आणि इतर जिल्ह्यांसह रायलसीमा भागांत असंतोष प्रचंड वाढला आहे.