आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिका प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या डेथ वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी, २७ जुलैला सुनावणी करेल. टाडा न्यायालयाने याकूबला ३० जुलैला फासावर चढवण्याचे वाॅरंट जारी केले आहे. या वॉरंटच्या वैधानिकतेलाच त्याने आव्हान दिले आहे. नऊ एप्रिलला फेरविचार याचिका खारिज झाल्यानंतर डेथ वाॅरंट काढण्यात आले होते. मात्र, माझी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. ही क्युरेटिव्ह पिटिशन मागच्या आठवड्यात खारिज झाली होती. क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय होण्यापूर्वी डेथ वाॅरंट जारी करणे बेकायदा आहे, असे मेमनचे म्हणणे आहे. मेमनच्या मते,‘ माझे सर्व पर्याय अजूनही संपलेले नाहीत. सर्व कायदेशीर पर्याय पूर्ण झाल्यानंतरच डेथ वॉरंट जारी करायला हवा. मी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेही दया याचिका पाठवली आहे.’ मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी एकापाठोपाठ एक १३ बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २५७ जण ठार, तर ७०० वर लोक जखमी झाले होते.

बचावासाठी दिला शबनम निकालाचा दाखला
याकूब मेमनने आपल्या अर्जात शबनम निकालाचा हवाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबनम आणि तिचा प्रियकर सलीमचे डेथ वॉरंट रद्द केले होते. दोघांची फाशीची शिक्षा १५ मे रोजी कायम ठेवण्यात आली होती. सहा दिवसांनी म्हणजे २१ मे रोजी डेथ वॉरंट काढण्यात आले होते. स्रव कायदेशीर पर्याय संपलेले नाहीत, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने २७ मे रोजी डेथ वॉरंट रद्द केले होते.
२०१० मध्ये आपल्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याचा आरोप शबनम आणि सलीम यांच्यावर होता. शबनम आणि सलीमचे डेथ वॉरंट फेरविचार, क्युरेटिव्ह आणि दया याचिकेपूर्वीच जारी करण्यात आले होते.