आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारवर कार्यकर्ते नाराज, नितीश कुमारांशी मैत्रीचा RSS चा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यामते भाजपचे कार्यकर्ते केंद्रातील मोदी सरकारवर नाराज आहे. मोदी सरकारच्या कामकाजावर भाजप कार्यकर्त्यांची निराशा स्पष्ट जाणवत आहे. ही निराशा दूर करण्यासाठी संघ स्वतः मॉनिटरींग करणार आहे. दिल्लीत सोमवारी भाजप आणि संघाची समन्वय बैठक झाली. यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याचा संदेश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि जेडीयू यांच्यातील मैत्री संपुष्टात आली होती. मात्र संघाने याबाबत भाजपला केवळ सल्ला दिला असून याबाबतचा अंतिम निर्णय पूर्णपणे भाजपवर सोपवण्यात आला आहे.

मंत्री नॉट रिचेबल, कार्यकर्त्यांची तक्रार
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शाह, सरचिटणीस रामलाल, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि नितीन गडकरी उपस्थित होते. संघातर्फे भय्याजी जोशी, कृष्ण गोपाल, सुरेश सोनी यांची उपस्थिती होती. सर्वच राज्यातील भाजपचे कार्यकर्ते आपले सरकार आहे, असे वाटतच नसल्याची तक्रार करत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. मंत्र्यांपर्यंत पोहोचताच येत नसल्याची तक्रारही नेहमीच होत असल्याचे सांगण्यात आले. पक्षातही काहीशी तशीच स्थिती आहे. संघाने ही तक्रार सोडवण्यासाठी एक स्वतंत्र टीम बनवण्याचा आग्रह केल्याची माहिती मिळाली आहे. त्या टीमने काय केल याचे मॉनिटरींग भाजप स्वतः करणार आहे.

भूसंपादन कायद्याच्या मुद्यावर संघ भाजपबरोबर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरएसएस नेत्यांनी भूसंपादन विधेयकावर भाजपच्या आक्रामक भुमिकेचे कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी भाजपवर शेतकऱ्यांचे विरोधी असा शिक्का लागू नये अशीही संघाची इच्छा आहे. त्यामुळे या मुद्यावर जपून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीदरम्यान संघाच्या प्रतिनिधींनी भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका अशा सूचना केल्याची माहितीही मिळाली आहे. या कायद्याच्या सकारात्मक बाजु समोर याव्यात यासाठी संघाचे कार्यकर्ते काम करणार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.