आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toyaba's Two Terrorist Connection With Muzaffarnagar, Delhi Police Claim

तोयबाच्या दोन अतिरेक्यांचे मुजफ्फरनगरशी कनेक्शन,दिल्ली पोलिसांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानातील खतरनाक दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांचे मुजफ्फनगरशी कनेक्शन असून हे दोघे मुजफ्फनगरमधील दोन रहिवाशांना भेटले होते, असा दावा दिल्ली पोलिसांनी बुधवारी केला. पोलिसांच्या या दाव्यामुळे तीन महिन्यांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला बळकटी मिळाली आहे. पाकिस्तानची आयएसआय संघटना मुजफ्फरनगर दंगलग्रस्त भागातील तरुणांच्या संपर्कात आहे, असा आरोप राहुल यांनी एका प्रचारसभेत केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी गुप्तचर अधिका-यांचा हवाला दिला होता. त्यांच्या वक्तव्यावरून देशभर काहूर माजले होते.
मुजफ्फरनगरच्या ‘त्या’ दोन रहिवाशांचा दंगलीशी संबंध नाही अथवा ते दंगलग्रस्त भागातील नाहीत, असेही दिल्लीच्या विशेष सेलचे विशेष आयुक्त एस. एन.श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. एका मशिदीच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने मोहंमद शाहिद आणि मोहंमद राशीद हे दोघे मुजफ्फरनगरमधील लियाकत अणि जमीर या दो रहिवाशांना भेटले होते. शाहिद आणि राशीद यांना नुकतीच हरियाणात अटक करण्यात आली. राशीद आणि शाहिद यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची पार्श्वभूमी तपासण्यात आली. त्यांच्यावर निगराणी ठेवण्यात आली, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. या दोघांनी दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी हा दावा केला.
तोयबा-मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांच्या
मुद्द्यावर भाजप-काँग्रेस आक्रमक
लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी आपल्या संघटनेत भरती करण्यासाठी मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांशी संपर्क साधल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि भाजप आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय दंगलग्रस्तांना लालूच दाखवत जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले होते. या वृत्तामुळे त्यांचे मत खरे ठरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. सरकारने लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
राहुल यांनी आॅक्टोबर महिन्यातील प्रचारसभेत व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी दिली.दंगलग्रस्तांना आमिष दाखवण्यासाठी तोयबाचे काही अतिरेकी मदत छावणीत गेल्याचे वृत्त खरे असले तर राहुल यांचेही वक्तव्य योग्य होते, असे सिंह म्हणाले.
राहुल यांच्या वक्तव्यावर सरकारने काय कारवाई केली : भाजप
पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि त्यासारख्या अन्य संघटनांना उत्तर प्रदेशात पैसा पुरवल्याचे उघड झाले आहे. सरकारने यावर कोणती कारवाई केली? हा राष्‍ट्रीय मुद्दा आहे. यात कोणालाही अटक झाली नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतरही कोणती कारवाई केली, हे काँग्रेसने सांगावे. या प्रकरणात सरकारने बजावलेली भूमिका अस्वीकारार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली.
मुजफ्फरनगर राजकारणातील प्यादे : नरेश अग्रवाल
मुजफ्फरनगर हे राजकारणातील प्यादे झाले आहे. सध्याच्या प्रकरणाची आपल्याला माहिती नाही. दिल्ली पोलिसांना काय कारवाई करायची आहे ते करू द्या. यावर राजकारण करू नये, असे समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी सांगितले.
भाजप-आयएसआय एकाच माळेचे मणी
जातीय दंगे पसरवण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि आयएसआय एकाच माळेचे मणी आहेत. देशाला याची चिंता आहे.’’ - शकील अहमद, प्रवक्ते, काँग्रेस