नवी दिल्ली - दूरसंचार नियामक ट्रायने
मोबाइल कंपन्यांच्या कमाल दरांची मर्यादा कमी केली आहे. त्यामुळे आता रोमिंग कॉल करणे २३ टक्क्यांनी आणि स्थानिक एसएमएस पाठवणे ७५ टक्क्यांनी स्वस्त होईल. एसएमएससाठी एक रुपयाऐवजी फक्त २५ पैसे लागतील. नवीन काॅल दर येत्या १ मेपासून लागू होणार आहेत.
ट्रायने स्थानिक कॉलचा कमाल दर १ रुपया प्रति मिनिटावरून कमी करून ८० पैसे प्रति मिनिट केला आहे. एसटीडी कॉलचा कमाल दर १.५० रुपयावरून कमी करून १.१५ रुपये केला आहे. ट्रायने आधी स्थानिक कॉलसाठी ६५ पैसे आणि एसटीडी कॉलसाठी १ रुपया कमाल दर प्रस्तावित केला होता. मात्र, कंपन्यांच्या विरोधामुळे ट्रायला माघार घ्यावी लागली.
नव्या दरांनुसार राष्ट्रीय एसएमएससाठी १.५० रुपयाऐवजी आता फक्त ३८ पैसे द्यावे लागतील. स्थानिक एसएमएससाठी १ रुपयाऐवजी २५ पैसेच लागतील. रोमिंगमध्ये असताना येणार्या कॉलवर ग्राहकांना विद्यमान ७५ पैशांऐवजी ४५ पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील.