आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • STING OPERATION: Trinamool Congress Leaders 'caught On Camera Accepting Cash' Watch

स्टिंगची चौकशी करा विरोधकांची मागणी, तृणमूल अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पक्षाच्या पाच खासदारांसह काही नेते पैसे घेताना दाखवणाऱ्या स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ टेप बाहेर आल्याने तृणमूल काँग्रेस पक्ष मंगळवारी लोकसभेत चांगलाच अडचणीत आला. या प्रकरणामुळे संसदेची अप्रतिष्ठा झाल्याची टीका झाली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजप, काँग्रेस आणि माकप यांनी केली. सरकारनेही या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा करतानाच तृणमूलच्या खासदारांविरुद्ध झालेल्या लाचेच्या आरोपांची चौकशी करण्याची तयारी दाखवली.

माकपचे सलीम मोहंमद यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. तृणमूलच्या खासदारांसह काही नेते एका बनावट खासगी कंपनीकडून पैसे घेत असल्याच्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख करून सलीम म्हणाले की, ‘अशा लोकांसोबत संसदेत बसत असल्याची लाज आम्हाला वाटत आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.’ भाजपचे एस. एस. अहलुवालिया आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनीही तृणमूलवर हल्ला चढवला. अहलुवालिया म्हणाले की, ‘या प्रकारामुळे संसद आणि लोकशाही व्यवस्था अडणीत आली आहे. पाच खासदार पैसे स्वीकारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपवावे.’ २००५-०६ मध्ये अशाच एका प्रकरणात काही सदस्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले होते, असा उल्लेखही अहलुवालिया यांनी केला. चौधरी म्हणाले की, हा सभागृहाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तृणमूल खासदार पैसे घेताना दिसले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी. सलीम, अहलुवालिया आणि चौधरी बोलत असताना तृणमूलचे खासदार शांत होते.

राज्यसभेतही चौकशीची मागणी
राज्यसभेतही डावे पक्ष आणि भाजपने हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची सभागृहाच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी माकपचे तपनकुमार सेन यांनी केली. भाजपच्या सदस्यांनीही त्यांना साथ दिली. मात्र आरोप करण्याआधी तुम्ही नोटीस दिली नाही, असे म्हणून उपसभापती पी. जे. कुरियन यांनी या सदस्यांना म्हणणे मांडण्याची परवानगी नाकारली.
संसदेची प्रतिष्ठा पणाला : व्यंकय्या नायडू
संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, झालेला प्रकार खरा आहे की खोटा हे अजून स्पष्ट झाले नाही, पण काहीतरी घडल्याचे दिसत आहे. त्यामुळे संसदेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हा प्रकार खोटा आहे असे वाटत असेल तर संंबंधित खासदार स्टिंग दाखवणाऱ्या संबंधित न्यूज पोर्टलविरुद्ध कारवाई करू शकतात. सरकार या प्रकरणाची चौकशी करू शकते किंवा अध्यक्षांनीच या प्रकरणाची दखल घ्यावी. अध्यक्षांनी या प्रकरणी सर्वांचे मत विचारात घ्यावे, असे मत नायडू यांनी व्यक्त केले.
हा राजकीय कट : सौगत रॉय यांचा आरोप
व्हिडिओ टेपमध्ये सौगत रॉय हे तृणमूलचे खासदार पैसे घेत असल्याचे दाखवले आहे. त्यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताच तृणमूल आणि काँग्रेस-माकपच्या सदस्यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. अध्यक्षांनी ते कामकाजातून वगळले. कोणत्या नियमानुसार हा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्यात आली, असा प्रश्न रॉय यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विचारला. ‘पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने हा राजकीय कट रचण्यात आला आहे. माकप, काँग्रेस आणि भाजपचा पराभव निश्चित आहे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...