आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांना अटक, रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांना रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात अटक केली. घोटाळ्यात एकाच आठवड्यात तृणमूलचे अटक झालेले ते दुसरे खासदार आहेत.बंदोपाध्याय यांचे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सीबीआयच्या कार्यालयात आगमन झाले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांची अनेक तास कसून चौकशी केली. ही चौकशी सुरू असताना परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. चौकशीनंतर बंदोपाध्याय यांना लगेच अटक झाली.
  
तृणमूलचे बंदोपाध्याय यांना अगोदर तीन वेळा समन पाठवण्यात आले होते. प्रश्नोत्तरानंतर आपण काही बोलू शकू, असे बंदोपाध्याय यांनी पत्रकारांना सांगितले. परंतु त्या अगोदरच त्यांना अटक झाली. गेल्या शुक्रवारी तृणमूलचेच खासदार तपस पाॅल यांनाही चिटफंड घोटाळ्यात सहभागी असल्यावरून अटक झाली होती. एकाच आठवड्यात अटक होणारे बंदोपाध्याय हे तृणमूलचे दुसरे खासदार ठरले आहेत. पॉल हे बंगाली चित्रपट क्षेत्रातील परिचित नाव असून ते अभिनेते आहेत. पुढे ते सक्रिय राजकारणात उतरले. परंतु घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका त्यांच्यावर अाहे. त्यांना गेल्या आठवड्यात अटक झाली व त्यांची भुवनेश्वरच्या सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शारदा घोटाळ्याहून मोठा, १७ हजार कोटींची माया  
रोझ व्हॅली चिटफंड घोटाळा शारदा घाेटाळ्याहून मोठा असल्याचा दावा करण्यात आला आहे. घोटाळ्याची रक्कम सुमारे १७ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. २० लाखांवर एजंटच्या माध्यमातून ही माया जमा करून गंडा घालण्यात आला. कंपनीचे २.७ लाख एवढे सक्रिय एजंट आहेत. त्यांनी ठेवी गोळा करण्याचे काम केले.  

गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल  
सीबीआयने या प्रकरणात जानेवारी २०१६ मध्ये कंपनीचे कार्यकारी व्यवस्थापक गौतम कुंडू यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. कुंडू हे मुख्य आरोपी आहेत. रोझ व्हॅली चिटफंडमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक झाली आहे. त्यामधील गुंतवणूकदार बंगाल, आेडिशा, आसाम, झारखंड, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा व आंध्र प्रदेशातील अाहेत.

मोदींनी आम्हाला सर्वांना  अटक करावी : ममता  
चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने तृणमूलच्या दोन खासदारांना अटक केल्यावरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. ममता म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सर्वांना अटक करून दाखवावी; परंतु आमचे आंदोलन आता थांबणार नाही. तृणमूल काँग्रेसने बुधवारपासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींनी सीबीआय, अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप ममतांनी केला आहे. नोटाबंदीनंतर ममतांनी मला अटक करून दाखवावी, असे थेट आव्हान पंतप्रधानांना दिले होते.  
 
 काय म्हणाल्या ममता 
- सुदीप यांच्या अटकेने तृणमुल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, 'मोदी आणि शहांनाही अटक झाली पाहिजे. मोदींना तर अजून भारतीय राजकारणच कळालेले नाही.'
- ममता म्हणाल्या, 'सरकारविरोधात अनेक पक्षांना आपले मत मांडायचे आहे मात्र आणीबाणीसारख्या परिस्थितीमुळे ते सर्व घाबरले आहे. लोकांनी आता नोटबंदीविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.'

 काय आहे रोज व्हॅली घोटाळा 
 - रोज व्हॅली कंपनीने देशातील अनेक गुंतवणुकदारांकडून 15 हजार कोटी रुपये जमा केले. यातील बहुतेक पश्चिम बंगाल, आसाम, बिहारमधून गोळा करण्यात आले होते.
 - मार्च 2015 मध्ये ईडीने रोज व्हॅलीचे चेअरमन गौतम कुंडु यांना चौकशीसाठी बोलावले होते, नंतर त्यांना अटक करण्यात आली.
 - या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवण्यात आला. ईडीने आपल्या तपासात म्हटले होते, की चिट फंड घोटाळ्यात नेत्यांना लाच देण्यात आली होती.
 - रोज व्हॅलीचे देशात 23 हॉटेल असल्याचेही म्हटले जाते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...