आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीचा थोडा काळ त्रास, पण दीर्घकालीन फायदा : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/कोलकाता - नोटाबंदीच्या निर्णयाचा थोडा काळ त्रास झाला तरी त्यामुळे दीर्घकालीन फायदाच होईल. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी आणि कामगार यांना फायदा होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी अनेक ट्विट्स करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा यांच्याविरोधात सुरू असलेल्या या ‘यज्ञात’ मनापासून सहभागी झाल्याबद्दल मी भारताच्या नागरिकांना सलाम करतो. आपण एकत्रितपणे भारतातून काळा पैसा हटवूया. या निर्णयामुळे गरीब, नवमध्यमवर्ग, मध्यमवर्ग आणि भविष्यातील अनेक पिढ्यांना फायदा होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे थोडीशी असुविधा होईल, पण थोडा काळ ह त्रास सोसल्यास दीर्घकालीन फायदा होईल. अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकरी, व्यापारी, कामगार यांना त्याचा फायदाच होईल. ग्रामीण भारताला या निर्णयाने लाभच होणार आहे.

आर्थिक संकटासाठी मोदीच जबाबदार : ममता : सध्याच्या आर्थिक संकटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत केली. त्या म्हणाल्या की, सध्याचे पंतप्रधान कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. केंद्रात टीमवर्क नाही. देशासाठी काय चांगले आहे हे पंतप्रधानांना समजत नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत नाही. ही एका व्यक्तीची हुकूमशाही आहे. ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.

विरोधी पक्षांचा ‘काळा दिवस’
नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना झाल्यानिमित्त विरोधी पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी संसद परिसरात ‘काळा दिवस’ पाळला. काँग्रेसव्यतिरिक्त तृणमूल काँग्रेस, माकप, भाकप, संयुक्त जनता दल, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या. या वेळी पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी हा कथित ठोस निर्णय घेतला आहे. ठोस निर्णय मूर्खपणाचाही असू शकतो. हा मूर्खपणाचा निर्णय आहे. त्यामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी, मच्छीमार, मजूर यांना मोठा फटका बसला आहे.’

हा तर ‘काळा पैसा पाठिंबा दिवस’ : नायडू
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी नोटाबंदीविरोधात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या विरोधी पक्षांवर टीका केली आहे. हा तर ‘काळा पैसा पाठिंबा दिवस ’ आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सर्वसाक्षी ईश्वरासाठी तरी काम करा; राष्ट्रपतींचे खासदारांना आवाहन
नवी दिल्ली | संसदेत सतत सुरू असलेल्या गोंधळामुळे कामकाज ठप्प होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी गुरुवारी विरोधी पक्षाला प्रखर शब्दांत सुनावले. संसद सदस्यांना मुखर्जी यांनी अपील केले, तुम्ही कामाला प्राधान्य द्या. त्या सर्वसाक्षी ईश्वरासाठी तरी काम करा. जनतेने प्रतिनिधींना गोंधळ घालण्यासाठी पाठवले नाही. संसदेचे कामकाज ठप्प करण्यासाठी गोंधळ घालणे ही सध्या रीतच झाली आहे.

डिफेन्स अॅस्टर लेक्चर-२०१६ मध्ये ‘मजबूत लोकशाहीसाठी सुधारणा’ या विषयावर राष्ट्रपती म्हणाले की, संसद सदस्यांना संसदीय कामकाज पूर्ण करण्यासाठी येथे पाठवले जाते, त्याचा खोळंबा करण्यासाठी नाही. प्रणव मुखर्जी दीर्घकाळ संसद सदस्य राहिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...