आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two BJP Leader Decreased; Advani Demanding To Bhagwat

भाजपातील दोन संघ नेत्यांची उचलबांगडी करा; अडवाणींची सरसंघचालक भागवतांकडे मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी सरसंघचालकांची भेट घेतली. भाजपचे सरचिटणीस (संघटन) रामलाल आणि संघाचे संयुक्त कार्यवाह सुरेश सोनी यांना पदमुक्त करण्याची मागणी अडवाणी यांनी भागवत यांच्याकडे केल्याचे समजते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करणे आणि रालोआतून जदयू बाहेर पडण्यासह इतर अनेक मुद्द्यांवर उभयतांत सुमारे तासभर चर्चा झाली.


रा. स्व. संघाचे मुख्यालय केशवकुंजवर अडवाणी भागवत यांच्या भेटीसाठी गेले होते. मोदी यांना राष्‍ट्रीय पातळीवर महत्त्व देण्यात आल्याने अडवाणी यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर भागवत यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मोदींच्या या नियुक्तीवरून नाराज झाल्याने जदयूने भाजपशी युती तोडल्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली, असे सूत्रांनी म्हटले आहे. आधी बुधवारी ठरलेली ही बैठक अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने टळली होती. रामलाल आणि सुरेश सोनी यांच्याबाबतही अडवाणी यांनी प्रश्न उपस्थित केले. हे दोघे संघाच्या वतीने पक्षाचा व्यवहार पाहतात. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजीमुळे अलीकडेच अडवाणी यांनी राजीनामा दिला होता.


नरेंद्र मोदी हुकूमशहा, अडवाणी लोकशाहीवादी
ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा तर अडवाणी यांना संपूर्ण लोकशाहीवादी ठरवले.कुलकर्णी यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. अडवाणी यांच्या सल्लागार नेत्यांपैकी एक असलेल्या कुलकर्णी यांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’शी केलेल्या चर्चेत अडवाणी यांची दखल न घेता मोदी यांच्या प्रचार समिती प्रमुखपदाच्या निवडीवर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, ‘मी जानेवारी 2013 मध्ये भाजप सोडली आहे. मात्र, माझ्या आयुष्यातील 16 वर्षे या पक्षासाठी दिले आहेत.’ भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह अतिमहत्त्वाकांक्षी असल्याचे सांगत कुलकर्णी म्हणाले, ‘राजनाथ पंतप्रधान होऊ शकतात, हा ज्योतिषाने निर्माण केलेला भ्रम आहे.’ मोदी यांनी भलेही मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले असेल, मात्र अडवाणी यांच्यात 85 व्या वर्षांतही देश व पक्षासाठी योगदान देण्याची भरपूर क्षमता आहे.


कौटुंबिक भावनेला मोल नाही
पक्षात सांस्कृतिक राष्‍ट्रवाद आणि कौटुंबिक मूल्ये जपली जात असल्याचा दावा करण्यात येतो. त्यांनी याबाबतही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भाजप स्वत:ला एक कुटुंब असल्याचे दाखवते आणि कुटुंबप्रमुखाच्या गैरहजेरीत मोठा निर्णय घेतला जातो. कुटुंबप्रमुखाकडे दुर्लक्ष केल्याची कृती ही भाजपमध्ये कौटुंबिक भावनेला मोल नसल्याचे दर्शवते. भाजपचे राजकारण कोणत्या दिशेने सरकत आहे, हे मी यातून लोकांना सांगू इच्छितो.’


कोण आहेत सुधींद्र कुलकर्णी
सुधींद्र कुलकर्णी यांनी 1996 मध्ये माकपचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी ब्लिट्झ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले आहे. 2008 मधील कॅश फॉर व्होट प्रकरणात कुलकर्णी आणि अन्य भाजप नेत्यांनी स्टिंग ऑपरेशन घडवून आणल्याचा आरोप आहे.


राजनाथ सिंह आत्मकेंद्रित : भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांना अतिमहत्त्वाकांक्षी ठरवत कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यात काम करणा-या ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करणा-या आत्मकेंद्रित नेत्याला भाजपच्या राष्‍ट्रीय धोरणात अचानक मोठे स्थान प्राप्त झाले आहे. दुसरीकडे ज्यांनी अनेक दशके पक्षाची नि:स्वार्थ सेवा करून पक्ष उभारणी केली, त्यांना एकाकी पाडले जात आहे.