आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two JeM Terrorists Sneak Into Delhi, Capital Put On High Alert

‘जैश-ए-मोहंमद’चे टार्गेट दिल्ली, दोन अतिरेकी घुसले, कडेकोट बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जैश-ए-मोहंमदचे दोन अतिरेकी राजधानी दिल्लीत घुसल्याचा संशय असून त्यांच्याकडून हायप्रोफाइल हल्ला व ओलीस ठेवण्याचा कट रचला जात अाहे. या माहितीनंतर पोलिसांनी रविवारी महानगरातील सुरक्षा कडक केली. पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी शनिवारी पंजाबच्या पठाणकोट हवाई तळावर हल्ला केला होता. त्यामुळे सुरक्षेचे आवश्यक उपाय योजिले जात आहेत.

दिल्ली पोलिसांना अतिरेकी घुसल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनीही नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादविरोधी लढ्यात नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती, वस्तू व हालचालीची माहिती १०० व १०९० क्रमांकावर द्यावी, असे टि्वट बस्सी यांनी केले आहे. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेचा आढावा घेतला. शहरातील महत्त्वाच्या संस्थांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाची मदत मागितली आहे. जैशच्या अतिरेक्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पठाणकोटच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानके, विमानतळ, बसस्थानके आणि अन्य ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस रोखली
उत्तर रेल्वेला दिल्ली आणि कानपूर रुळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्स्प्रेस गाझियाबादमध्ये रोखण्यात आली. यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाला, सकाळी रेल्वे नियंत्रण मंडळाला या मार्गावरील रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्यांची शहरातील सर्व स्थानकांत तपासणी करण्यात आली.

हल्ला भारत-पाक संबंध बिघडवण्यासाठी : कलराज मिश्र
कोईम्बतूर- आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या हवाई तळावर हल्ल्याची घटना दुर्दैवी ठरवत केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी भारत-पाकिस्तानातील संबंध बिघडवण्यासाठी हे केले जात असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीतून निर्माण झालेले चांगले वातावरण ज्या अतिरेक्यांना पचनी पडले नाही त्यांच्याकडूनच पठाणकोट हल्ला करण्यात आल्याचे मिश्र यांनी सांगितले.

भारत-पाक संबंधात सुधारणा : सरताज
इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या संबंधांत सुधारणा दिसून येत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. आगामी १५ जानेवारीला दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. या वेळी पुढील सहा महिन्यांच्या चर्चेचा अजेंडा तयार केला जाईल. अजीज म्हणाले, या अजेंड्यात काश्मीर, सियाचीन आणि पाणीवाटपाचे मुद्देही सामील आहेत. पठाणकोटच्या हल्यानंतर अजीज यांनी हे वक्तव्य केले.

वाटाघाटीत अडथळा : पाक माध्यमांचा दावा
भारतातील हवाई दलाच्या तळावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शांतता चर्चा रुळावर येण्यात अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी उच्चस्तरीय बैठकीतून चांगली वातावरणनिर्मिती केली असली तरी नव्याने वाटाघाटी सुरू होणे आव्हानात्मक ठरेल, असे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीनंतर ही घटना घडली आहे.