आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणारे बाहेरचेच, उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात देशविरोधी वादग्रस्त आणि भडक घोषणाबाजी करणारे लोक बाहेरून आलेले होते. त्यांचा या विद्यापीठाशी काहीही संबंध नव्हता, असा अहवाल विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने दिला आहे. ओळखू येऊ नये म्हणून चेहरे झाकून आलेला हा गट भडक घोषणा देत होता, असे समितीचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या ९ फेब्रुवारी रोजी जेएनयू परिसरात "भारत की बर्बादी तक जंग रहेगी...' अशा घोषणा दिल्याचे उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही आढळत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवाल सांगतो की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीमध्ये मात्र अशा घोषणा आपण परिसरात ऐकल्याचे नमूद केले आहे. "भारत के टुकडे टुकडे कर दो...' अशा घोषणा दिल्या गेल्याचा उल्लेख या चौकशी अहवालात कुठेही नाही. विद्यापीठातील प्रोफेसर राकेश भटनागर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीने चौकशीअंती हा अहवाल तयार केला आहे. बाहेरच्या लोकांना या विद्यापीठाच्या आवारात येऊन भडक घोषणा देण्याची परवानगी कशी मिळाली, ही बाब अनाकलनीय असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचा ठपका समितीने विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर ठेवला आहे. "त्या' कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उमर खालिद अाग्रही होता. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असा इशारा देत सुरक्षा रक्षकांनी काय कारवाई करायची ती करावी, असेही खालिद याने बजावले होते, अशी अहवालात नोंद आहे.

बाहेरच्या लोकांचा वावर होताच
विद्यापीठ परिसरात ९ फेब्रुवारी रोजी काही बाहेरचे लोक चेहरे झाकून येत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्याही लक्षात आले होते. काही प्रत्यक्षदर्शींच्याही हे लक्षात आले होते. चेहरे झाकलेला हाच गट "काश्मीर की आझादी तक जंग रहेगी, जंग रहेगी...', "भारत को रगडा दो रगडा दो... जोर से रगडो', "गो इंडिया गो बॅक', "पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देत होता, असे चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या घोषणाबाजीत जेएनयूचा एक विद्यार्थी पण सहभागी होता, असे अहवाल सांगतो.