नवी दिल्ली- राजधानी दिल्लीची मान पुन्हा शरमेने झुकली आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.एका पीडितेचे वय अडीच तर दुसरीचे पाच वर्षे आहे. आठवडाभरापूर्वी येथे चारवर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नायब राज्यपाल काय करत आहेत, असा सवाल केला.
पहिली घटना नांगलोई भागात घडली. पीडितेच्या आईने सांगितले की, अडीच वर्षीय मुलगी घराजवळ रामलीला पाहण्यासाठी गेली होती. तेथे तिचे अपहरण झाले. सकाळी घराजवळील पार्कमध्ये ती बेशुद्धावस्थेत आढळली. वैद्यकीय चाचणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण तिला उचलून नेतानाचे दृश्य चित्रित झाले आहे.
दुसऱ्या घटनेत आनंदविहार भागात पाच वर्षे वयाच्या मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. चिमुकली घरात एकटी असताना तिघांनी तिला बाहेर नेत नृशंस कृत्य केले. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.