आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मंगळयान प्रकल्पापेक्षा दोन वाघांचा जीव जास्त फायदेशीर’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाघ आणि मंगळयान यांची तुलना भलेही आश्चर्यकारक वाटली तरी एक नवीन जैव आर्थिक विश्लेषण अत्यंत वेगळ्या दिशेने विचार करायला लावते. त्यानुसार दोन वाघांना वाचवल्याने होणारा फायदा मंगळयान प्रकल्पाच्या गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. भारतीय आणि ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांच्या एका पथकाने त्यासंबंधी एक दस्तऐवज प्रकाशित केला आहे.  

‘मेकिंग द हिडन व्हिजिबल : इकॉनॉमिक व्हॅल्युएशन ऑफ टायगर रिझर्व्हज इन इंडिया’ नावाचे हे विश्लेषण ‘इकोसिस्टिम सर्व्हिसेस’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार दोन वाघांना वाचवण्यामुळे होणारा लाभ ५२० कोटी रुपये आहे. याउलट इस्रोची मंगळ ग्रहावर मंगळयान पाठवण्याच्या तयारीसाठीची एकूण गुंतवणूक ४५० कोटी रुपये आहे. 

सध्या भारतात प्रौढ वाघांची संख्या २,२२६ आहे. या विश्लेषणानुसार, या वाघांना वाचवल्याने एकूण फायदा ५.७ लाख कोटी रुपये होईल. ही रक्कम नोटाबंदीदरम्यान जमा एकूण रकमेच्या एक तृतीयांश एवढी आहे. वैज्ञानिकांनी या विश्लेषणाआधी देशातील सहा वाघ अभयारण्यांचा अभ्यास केला. त्यांचे संरक्षण म्हणजे २३० अब्ज डॉलर एवढी रक्कम सुरक्षित ठेवण्यासमान आहे. या रकमेला वैज्ञानिकांनी व्याघ्र अभयारण्यासाठी ‘स्टॉक बेनिफिट्स’ म्हटले आहे.  भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्थेचे प्रा. मधू वर्मा यांच्या नेतृत्वाखालील या वैज्ञानिकांच्या पथकाचे म्हणणे आहे की, भारतात व्याघ्र अभयारण्ये जैवविविधतेच्या संरक्षणासाठीही महत्त्वपूर्ण आहेत. ते पर्यावरणाशी संबंधित सेवांच्या रूपात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक लाभही मिळवून देतात.  

वाघांच्या संरक्षणाकडे वार्षिक नफ्याच्या व्याजाच्या स्वरूपात पाहिले जाऊ शकते. विश्लेषणात नमूद केल्यानुसार, भारतातील प्रत्येक वाघ वाचवण्यासाठी झालेल्या गुंतवणुकीवरील नफा त्याच्या ३५६ पटींपेक्षा जास्त आहे. कुठलाही उद्योग किंवा सेवा एवढा उच्च परतावा देऊ शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...