आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ अनुदान आयोगाशी खटके, दिल्ली विद्यापीठच्या कुलगुरूंचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चार वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावरून दिल्ली विद्यापीठ (डीयू) आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये (यूजीसी) टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. यूजीसीने जारी केलेल्या निर्देशाच्या निषेधार्थ नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोडांवरच दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेश सिंग यांनी राजीनामा दिल्यामुळे हे प्रकरण आणखीच गंभीर बनले आहे.

दिल्ली विद्यापीठाने यूजीसीच्या नियमांना तडा देत चार वर्षे कालावधीचे पदवी अभ्यासक्रम सुरू केले होते. हे अभ्यासक्रम नियमबाह्य असून या शैक्षणिक वर्षात तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमांनाच प्रवेश देण्यात यावेत, चार वर्षे कालावधीच्या अभ्याक्रमाची प्रवेश प्रक्रिया करू नये, असे परिपत्रक यूजीसीने विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठवल्यानंतर वाद उफाळून आला आणि त्यामुळे सिंग यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला.

यूजीसी आणि दिल्ली विद्यापीठात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मंगळवारपासून सुरू होणारी नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. कुलगुरूंच्या राजीनाम्याचे वृत्त कळताच विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात ढोलताशांच्या गजरात नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला. प्राध्यापकांचाही चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाला विरोध होता.

अहवालाआधीच राजीनामा
चार वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम बंद करून बुधवारी दुपारपर्यंत पूर्तता अहवाल सादर करण्याचे निर्देश यूजीसीने दिल्ली विद्यापीठाला दिले होते. तो अहवाल देण्याआधीच कुलगुरू दिनेश सिंग यांनी राजीनामा दिला.

वादाचे कारण
दिल्ली विद्यापीठ स्वायत्त असून स्वत:चे अभ्यासक्रम आणि त्यांचा कालावधी ठरवण्याचा विद्यापीठाला अधिकार आहे. यूजीसीचे निर्देश स्वायत्तेवर अतिक्रमण आहे, अशी कुलगुरू दिनेश सिंग यांची भूमिका होती.

छायाचित्र : दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा दिल्याचे कळताच एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी असा आनंद साजरा केला.