आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूजीसीचा "भारतवाणी'तून संवाद, भाषांची माहिती मल्टिमीडिया फॉरमॅटमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वंकष आणि आतरसंवादात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) जगातील सर्वात मोठे ज्ञानवर्धक संकेतस्थळ आणण्याच्या तयारीत आहे. भारतवाणी नामक या संकेतस्थळावर भारतातील सर्व भाषांतील माहिती उपलब्ध असेल.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव जसपालसिंह संधू यांनी "भारतवाणी' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी २४ नोव्हेंबर रोजी देशातील सर्व कुलगुरूंना एक पत्र लिहिले आहे. विद्यापीठ क्षेत्रातील सर्व महाविद्यालयांकडे विविध भाषांत उपलब्ध असलेली संगणकीकृत आणि असंगणकीकृत माहिती उपलब्ध करून देण्याचे त्यांनी या पत्रात आवाहन केले आहे. भारतवाणी संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतातील सर्वच भाषांतील माहिती मल्टिमीडिया फॉरमेटमध्ये लोकांना उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट अाहे. हे संकेतस्थळ पूर्ण समावेशक, संवादात्मक, वेगवान आणि नियंत्रित असेल, असेही संधू यांनी पत्रात म्हटले आहे. भारताच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाला मुक्त ज्ञान समाजाच्या रूपात जगासमोर आणण्याची या योजनेची कल्पना आहे.

भारतात २३४ मातृभाषा
२००१ च्या जनगणनेनुसार, देशात १२२ अनुसूचित आणि सूचित भाषा, तर २३४ मातृभाषा आहेत. त्यामुळे या सर्व भाषा एकाच संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यास लोकांपर्यंत माहितीचा मोठा पोहोचेल.

संकेतस्थळावर इत्थंभूत माहिती
"भारतवाणी'वर सरकारी व खासगी संस्थांकडून प्राप्त माहिती, लेखकांचे साहित्य शिवाय सरकारी, खासगी संस्था तसेच विविध शैक्षणिक मंडळाची माहिती उपलब्ध असेल.
नागरिकांनाही देता येईल माहिती
अनुदान आयोगाने विद्यापीठांना याविषयी योग्य माहिती उपलब्ध करून देणाऱ्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींची माहितीही मागवली आहे. त्यामुळे या योजनेत नागरिकांनाही आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती यूजीसीला देता येईल.