आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथमध्ये अघोषित संचारबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारनाथ - केदारनाथच्या जलप्रलयास तीन महिने झाले. अभूतपूर्व नुकसान झाल्याने मंदिरातील मुख्य मूर्ती गुप्तकाशीला हलवण्यात आली होती. बुधवारी केदारनाथ मूळ मंदिरात परतणार असून त्या दिवशी पहिली पूजा होईल. आता सर्व काही ठीक झाल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. परंतु सत्य वेगळेच आहे. प्रलयाच्या वेळी ढिगार्‍याखाली दबलेले मानवी सांगाडे आता बाहेर पडू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत 184 पेक्षा जास्त मृतदेह मिळाले. परिसरातील 22 गावांपर्यंत शासन अद्याप कोणतीच मदत पोहोचवू शकलेले नाही. हे सत्य दडपण्यासाठीच सरकारने या परिसरात अघोषित संचारबंदी लागू केली आहे. केदारनाथकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा आहे. कुणालाच आत जाऊ दिले जात नाही. या भागात संचारबंदी आहे काय, असे विचारले असता उपजिल्हाधिकारी म्हणाले, काय समजायचे ते समजा. रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी जावडकर म्हणाले, आम्हाला तसेच कठोर निर्देश आहेत.
शंभर वर्षांत प्रथमच पंडे, भाविकांशिवाय पूजा
महाप्रलयानंतर भगवान केदारनाथाची शुद्धीकरण पूजा 11 सप्टेंबर रोजी सकाळी सात ते अकरा या वेळेत होणार आहे. त्यासाठी 24 लोकांचे विशेष पथक हेलिकॉप्टरने तेथे नेण्यात येणार आहे. यात मुख्य पुजारी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा व काही मंत्री सहभागी होणार आहेत. त्यांच्याशिवाय इतर कुणालाही मंदिर परिसरात प्रवेश नसेल.पूजेच्या वेळी भाविकांना उपस्थित राहता येणार नाही. गेल्या शंभर वर्षांत भाविकांशिवाय केदारनाथाची पूजा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. दरम्यान, केदारसभा संघर्ष समितीने बॅरिकेड्स तोडून मंदिरात पोहोचण्याचा इशारा दिला आहे. मंदिर भाविकांचे आहे, सरकारचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.