नवी दिल्ली - मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिमसोबत वाटाघाटी केल्याच्या वक्तव्यावरून दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी घूमजाव केले आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर दाऊदने
आपल्याला फोन करून आत्मसमर्पण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे नीरजकुमार आधी म्हणाले होते. त्यावरून वाद उद्भवताच, याबाबतचे वृत्त चुकीचे असल्याचे घूमजाव त्यांनी केले.
तत्कालीन सरकारने दाऊदला शरणागती घेण्यापासून रोखले होते, असा दावा नीरजकुमार यांच्या मुलाखतीच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने केला. तो फेटाळताना नीरजकुमार म्हणाले की, मी मुलाखतच दिली नाही. ती फक्त अनौपचारिक चर्चा होती. वार्ताहराने भ्रामक व खोटीनाटी तथ्ये देऊन त्याची बातमी केली. दाऊदने कधीच आत्मसमर्पणाचा प्रस्ताव दिला नव्हता, तसेच कुणीही त्याला असे करण्यापासून रोखले नव्हते, असे स्पष्टीकरण नीरजकुमार यांनी दिले. तथापि, दाऊदने आपल्याशी संवाद साधला होता, हे त्यांनी मान्य केले. पण तो मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रकरणासंदर्भात आपल्या बचावादाखल होता, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
तीन वेळा बातचीत
वृत्तपत्रात नीरजकुमार यांच्या हवाल्याने प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे की, जून १९९४ मध्ये दाऊदने आपल्याशी तीन वेळा बातचीत केली होता. त्याच्या मनात आत्मसमर्पण करण्याचा विचार येत होता. मात्र, भारतात परतलो तर विरोधी गँगमधील लोक आपल्याला मारून टाकतील, अशी चिंता त्याला होती. यावर, सीबीआय तुमची सुरक्षा करेल, असा विश्वास मी त्याला दिला. तथापि, तेव्हाच्या केंद्र सरकारने त्याला नकार दिला होता. त्या वेळी नीरजकुमार हे सीबीआयमध्ये डीआयजी होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा तपास सुरू होता.
यापूर्वीही केले होते असे दावे
नीरजकुमार यांनी १७ एप्रिलला म्हटले होते की, सीबीआयने बाहेरील हस्तकांकरवी दाऊदपर्यंत पोहोचण्याची योजना आखली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याच्या एका दिवसाआधी राजकीय बॉसकडून परवानगी घ्यावी, असे ठरले. मात्र, आपण पाकिस्तान नव्हे भारत आहोत, असे म्हणत त्या राजकीय बॉसने नकार दिला.
पुस्तकात गौप्यस्फोट
नीरजकुमार हे अंडरवर्ल्ड केसेसचे तज्ज्ञ समजले जातात. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेतील १० तपासांवर ते पुस्तक लिहीत असल्याचे म्हटले जाते. त्यातील एक प्रकरण त्यांच्या व दाऊदच्या संवादावर आधारित असेल. पुस्तकाला अजून बराच वेळ असल्याची चर्चा माध्यमांत आहे.
जेठमलानी यांनाही फोन
१९९३ स्फोटांनंतर दाऊदने आपल्याला फोन करून आत्मसमर्पण करण्याचा विचार बोलून दाखवला होता, असा दावा ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनीही यापूर्वी केलेला आहे. मात्र, मुंबई पोलिस आपल्याला "टॉर्चर' करणार नाहीत व घरातच नजरकैदेत ठेवतील, अशा अटी त्याने आत्मसमर्पणासाठी ठेवल्या होत्या. मात्र, सरकार या अटींवर आत्मसमर्पणास तयार झाले नव्हते, असे जेठमलानी म्हणालेले आहेत.
दाऊदचा पंटर मनीष लालाने घडवला होता संपर्क
नीरजकुमार म्हणाले, मनीष लाला याने दाऊदसाेबत अापला संवाद घडवला होता. लाला दाऊदचा कायदेशीर सल्लागार होता. त्याच्याकडे विधी पदवी नव्हती, पण त्याचे कायद्याचे ज्ञान थक्क करणारे होते. आपण लाला याला मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात भेटलो होतो. ४ जून १९९८ ला दाऊदचा कट्टर दुश्मन छोटा राजनच्या पंटर्सनी लालाची हत्या केली.