आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्‍न सुरक्षा विधेयक मंत्रिमंडळाकडून मंजूर, याच आठवड्यात संसदेत मांडणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्त्वाकांक्षी अन्‍न सुरक्षा विधेयकाला मंजूरी दिली. आता लवकरच हे विधेयक संसदेमध्‍ये सादर करण्‍यात येणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्‍यात काही बदलांसह विधेयकाला मंजूरी देण्‍यात आली. हे विधेयक म्‍हणजे कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. या विधेयकामुळे जनतेला स्‍वस्‍त दरात धान्‍य देण्‍याची योजना आहे. भाजपने या विधेयकाचे स्‍वागत केले आहे. तर बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी कॉंग्रेसवर पुन्‍हा स्‍तुतिसुमने उधळली आहेत. सत्ता कशी राखावी, याचा जुगाड कॉंग्रेसला चांगला ठावूक आहे, असे नितीश कुमार म्‍हणाले.

अन्‍न सुरक्षा विधेयकाच्‍या तरतुदीनुसार तांदूळ 3 रुपये तर गहू 2 रुपये प्रति किलोच्‍या दराने मिळेल. याचा फायदा देशाच्‍या 67 टक्‍के लोकांना होईल. हे विधेयक संसदेमध्‍ये याच आठवड्यात सादर करुन मंजूर करण्‍याचे प्रयत्‍न करण्‍याचे सरकारचे प्रयत्‍न आहेत.

सरकार यासाठी अंत्‍योदय अन्‍न योजना सादर करणार आहे. त्‍यामार्फत 2.43 कोटी गरीब कुटुंबांना अन्‍न पुरविण्‍यात येईल.दारिद्र्य रेषेखालील लोकांना तांदूळ 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो, ज्‍वारीसारखे धान्‍य 1 रुपये किलोच्‍या दराने मिळेल. ग्रामिण भागातील 75 तर शहरातील 50 टक्‍के जनता या विधेयकाच्‍या कक्षेत येईल.

प्रति व्‍यक्ती 7 किलो एका कुटुंबाला देण्‍यात येईल. या योजनेमुळे सरकारला सुरुवातीला 23 हजार कोटी रुपयांचा बोजा वाढेल. तर प्रत्‍यक्ष अंमलबजावणीनंतर 1.3 लाख कोटी रुपयांचे अनुदानाचा बोजा सरकारी खजिन्‍यावर वाढेल. यापूर्वीही हे विधेयक संसदेत मांडण्‍याचे प्रयत्‍न झाले होते. परंतु, काही राज्‍यांनी त्‍यास विरोध केला होता.