आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - उत्तर प्रदेशात उन्नाव जिल्ह्यातील डोंडियाखेडा गावात राजा राव रामबख्शसिंह यांच्या किल्ल्यात 1 हजार टन सोने जमिनीखाली दडले असल्याचा दावा करणारे संत शोभन सरकार यांच्यासह त्यांचे पट्टशिष्य ओमबाबा तसेच केंद्रीय मंत्री चरणदास चांगलेच अडचणीत आले आहेत. जनता दलाने (संयुक्त) या तिघांविरुद्ध दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शोभन सरकार यांच्या पत्रावरून केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात उत्खननाची परवानगी दिल्यानंतर जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष शरद यादव यांनी यावर टीका करून उत्खननास विरोध केला होता. तसेच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला होता.
आमचा विरोध अंधश्रद्धेला
एका वृत्तवाहिनीशी बोलताना जदयूचे खासदार के. सी. त्यागी यानी सांगितले, ‘आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही. ओम बाबांबद्दलही आमची काही तक्रार नाही. आमचा अंधश्रद्धा पसरवण्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे.’ लोकसभा आणि राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करून शोभन सरकार आणि मंत्री चरणदास महंत यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी जनता दल करेल, असा इशाराही त्यागी यांनी दिला.
दरम्यान, वाराणशी येथील एका कोर्टातही या प्रकरणी शोभन सरकार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. यात अॅड. कमलेश त्रिपाठी यांनी सरकार यांच्यावर धार्मिक अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे.
आम्ही चौकशीस तयार : ओमबाबा
शोभन सरकार यांचे शिष्य ओमबाबा यांनी आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या चौकशीत आपले संपूर्ण सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.
दिग्गीराजांनी उडवली मोदींची खिल्ली
शोभन सरकार यांच्यावर अगोदर टीका करून नंतर सरकार यांच्या त्यागाला प्रणाम करणारे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी खिल्ली उडवली. ट्विटरवर त्यांनी अखिल अरजरिया यांची एक कविता टाकली आहे. यात कवी म्हणतो, ‘कहे अखिल कविराय, तुरंग ही पलटी खाई... करत संत सम्मान, दे रहे खूब सफाई...
स्वप्न... आम्ही म्हणालोच नाही!
शोभन सरकार किंवा आपण स्वत: सोन्याच्या खजिन्याचे स्वप्न सरकार यांनी पाहिले आणि त्यानुसार उत्खनन करावे, असे कधीही म्हटलेले नाही. याउपर ज्यांना कुणाला तक्रार करावयाची आहे त्यांनी ती करावी. कारण, लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, असे ओमबाबा यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.