नवी दिल्ली - काळा पैसा परत आणण्याची ग्वाही तर दिली, त्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले; परंतु विदेशात नेमका काळा पैसा किती हे माहीत नसल्याचे सांगून पंतप्रधान
नरेंद्र मोदी विरोधकांच्या टीकेचे धनी मात्र ठरले आहेत. लोकसभेच्या प्रचारात मोदींनी काळा पैसा परत आल्यास गरिबांच्या खिशात १५-२० लाख रुपये येतील, असा दावा केला होता.
मोदींनी गेल्या महिन्यापासून आकाशवाणीवर "मन की बात' हे सदर सुरू केले. दुस-या भागात रविवारी त्यांनी स्वच्छता, खादी व व्यसनाधीनता या मुद्द्यांचा ऊहापोह केला. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर बोलून मात्र ते वादात अडकले.
मोदी म्हणाले, काळ्या पैशाबाबत तुमच्या प्रमुख सेवकावर विश्वास ठेवा. बाहेर किती पैसा आहे हे मला, तुम्हाला, सरकारला किंवा आधीच्या सरकारलाही ठाऊक नाही. प्रत्येक जण वेगवेगळे आकडे सांगत आहे. मला आकड्यात अडकायचे नाही. रुपया, दोन रुपये...कोटी, अब्ज. किती का असेनात, देशातील गरिबांचा हा पैसा आहे. त्यातील पै न पै परत आली पाहिजे ही माझी कमिटमेंट आहे, असे मोदी म्हणाले.