आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएचा घोटाळ्यातील नावे वगळण्यासाठी दबाव; विनोद राय यांचा खळबळजनक आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कोळसा घोटाळा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याच्या लेखा अहवालातून काही महत्त्वाची नावे वगळण्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारमधील काही नेत्यांनी दबाव आणला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारताचे निवृत्त नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी केला. या आरोपामुळे काँग्रेस नेतृत्वाची अडचण होऊ शकते.

राय यांचे ‘नॉट जस्ट अॅन अकाउंट’ हे आत्मकथन १५ सप्टेंबरला प्रसिद्ध होत आहे. यात त्यांनी या दोन्ही घोटाळ्यांबाबत यूपीए सरकारमधील नेत्यांनी कसा दबाव आणला याचे सविस्तर वर्णन केले आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अनेक निर्णयांमुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याचेही राय यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांची भूमिका कोणत्याही सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही संवेदनशील प्रकरणांत त्यांचाच निर्णय अंतिम असतो. मात्र, डॉ. सिंग यांनी अनेक प्रकरणे निर्णयाविना प्रलंबित ठेवली. योग्य वेळी योग्य निर्णय त्या काळात घेतले गेले नाहीत, असा आरोपही राय यांनी केला आहे. प्रत्येक वेळी आघाडी सरकारच्या अपरिहार्यतेचा पाढा वाचून प्रशासकीय शिस्तीचा बळी देणे योग्य ठरत नसल्याचेही राय यांनी म्हटले आहे.

असे सुचले शीर्षक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका जनिहत याचिकेवर निरीक्षणे नोंदवताना न्यायालयाने "कॅग इज नॉट जस्ट मुनिम' असे म्हटले होते. सूत्रांनुसार, यावरून आपल्या आत्मकथनास ‘नॉट जस्ट अॅन अकाउंट’ हे शीर्षक सुचल्याचे राय यांनी म्हटले आहे.

सहज-सोपी भाषा
राय यांच्यानुसार, त्यांच्या आगामी पुस्तकातील भाषाही अगदी सहज-सोपी असून सामान्य माणसालाही यातील तथ्य सहजपणे आकलन होईल. विद्यार्थ्यांसह सर्वच स्तरातील लोकांना समजेल अशी ही भाषा असल्याचा दावा राय यांनी
केला आहे.
तेव्हा गप्प का?
राय यांनी तेव्हाच या गोष्टींची वाच्यता का केली नाही, असा प्रश्न विचारला तेव्हा सूत्रांनी सांिगतले की, ते स्वत: त्या काळात एका उच्च घटनात्मक पदावर होते. तेव्हा या बाबी उघड केल्या असत्या तर पदाची प्रतिष्ठा राखली गेली नसती. आज निवृत्तीनंतर भाष्य करण्यास राय यांच्यावर बंधन नाही.
निवासस्थानी पत्रकारांना टाळले
रविवारी राय यांच्या पुस्तकांतील गौप्यस्फोटावरून खळबळ उडाल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्या िनवासस्थानी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार िदला. सूत्रांनुसार, राय यांनी म्हटले आहे की, आपल्या आगामी पुस्तकातील प्रत्येक शब्द सत्य असून या माध्यमातून कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश नाही. प्रशासनात सुधारणा घडून यावी हा मुख्य उद्देश आहे.

काँग्रेसकडून तीव्र निषेध
राय यांनी केलेला दावा फेटाळून काँग्रेसने त्यांचा तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ज्या वेळी एखाद्या नेत्याचे नाव ठेवायचे किंवा काढायचे याबाबत राय यांच्यावर दबाव आणला जात होता तेव्हाच त्यांनी या गोष्टीची वाच्यता का केली नाही? निवृत्तीनंतर खळबळ माजवण्याच्या दृष्टीने त्यांनी या बाबी मुद्दाम दडवून ठेवल्या होत्या का, असेही तिवारी म्हणाले.

पदाधिकाऱ्यांची फौजच
राय यांनी दावा केला आहे की, कोळसा घोटाळा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यासंबंधीच्या अहवालातून ठरावीक नावे काढून टाकण्यासाठी दबाव निर्माण व्हावा म्हणून यूपीए सरकारने पदाधिकाऱ्यांची खास फौज तयार केली होती. एवढेच नव्हे, तर कॅगचा पदभार स्वीकारण्यापूर्वी याच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आयएएस सहकाऱ्यांनाही घोटाळ्यातून काही नावे वगळण्यासाठी दबाव आणला होता, असे राय यांचे म्हणणे आहे.

बैठकांतही दबाव
संसदेच्या लोकलेखा समितीच्या बैठकीतही अनेकदा काँग्रेस सदस्यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असे राय यांचे म्हणणे आहे. किचकट प्रश्न विचारून हे सदस्य दबाव आणू पाहत होते, असे ते म्हणतात.