नवी दिल्ली - गुजरातमध्ये राज्याचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून पोलिसांमार्फत एका महिलेवर पाळत ठेवली गेल्याच्या प्रकरणाचा तपास कायमचा फाइलबंद होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. 26 डिसेंबर 2013 रोजी तत्कालीन यूपीए सरकारने चौकशी आयोग नेमून तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अजूनही तपास सुरू होऊ शकलेला नाही.
भाजपचा होता विरोध : या प्रकरणाची चौकशी करण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपने सुरुवातीपासूनच विरोध केला होता. विद्यमान केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी चौकशी आयोग नेमण्याच्या निर्णयावर एनडीए सरकार फेरविचार करेल, असे सांगून ही चौकशी गुंडाळण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता हा विषय कॅबिनेटसमोर येत आहे.
2009 मधील प्रकरण : ‘साहेबांच्या’ सांगण्यावरून अमित शहा यांनी पोलिसांना एका महिलेवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते. हे ‘साहेब’ म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच होते, असा आरोप काँग्रेसने केला होता. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश यूपीए सरकारने गुजरातला दिले होते.