नवी दिल्ली - यूपीएससी परीक्षेतून सी-सॅट रद्द करण्याची मानसिक तयारी केंद्र सरकारने केली आहे. मात्र याबाबत शिफारशी करण्यासाठी नेमलेल्या अरविंद वर्मा समितीने सी-सॅट सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सरकारने समितीच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेण्यास आणखी वेळ मागितला आहे.
दरम्यान, यूपीएससीचा मुद्दा शुक्रवारी पुन्हा संसदेत तापला. परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठीची मुदत बुधवारी संपल्यानंतरही तोडगा न निघाल्याने दोन्ही सभागृहांत विरोधक प्रचंड आक्रमक झाले. राज्यसभेत गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.
वृत्तपत्र फाडून अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले
राजदचे सदस्य राजेश रंजन हौद्यात आले. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करत त्यांनी एक वृत्तपत्र फाडले आणि अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले. शून्य प्रहरात महाजन यांनी चांगलेच सुनावल्यानंतर रंजन यांनी दोनदा माफी मागितली.