आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPSC News In Marathi, Divya Marathi, Blind Person

यूपीएससी परीक्षेत दृष्टिहीन उमेदवारांना मिळणार जादा वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेत दृष्टिहीन उमेदवारांना प्रत्येक विषयाच्या पहिल्या व दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी २०-२० अशी ४० मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे. आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत दोन अनिवार्य पेपरसाठी प्रत्येकी २०० गुण असतात. उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी दोन तासांचा वेळ दिला जातो. आता दृष्टिहीनांसाठी प्रत्येक पेपरला ४० मिनिटे अधिक वेळ मिळेल. दिल्ली उच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतल्या जातात. यातून आयएएस, आयएफएस आणि आयपीएस अधिकारी निवडले जातात. अन्य एका सूचनेनुसार उमेदवारांना आता दुसऱ्या पेपरमध्ये विचारले जाणारे आकलन कौशल्यावर आधारित इंग्रजीचे प्रश्न सोडवण्याची गरज नाही. कारण, हे गुण गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत आता प्रत्येकी २०० गुणांचे दोन अनिवार्य पेपर असतील. यातून आकलन कौशल्यावर आधारित प्रश्नांचे गुण वजा केले जातील.

यूपीएससीच्या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आल्यानंतर यातील दुसऱ्या सी-सॅटच्या पेपरवरून वाद झाला होता. यावरून राजधानी दिल्लीत इच्छुक उमेदवारांनी जोरदार आंदोलन चालवले होते. िवशेषत: हिंदी भाषिक उमेदवारांना सी-सॅट स्वरूपाला व‍िरोध होता. यात इंग्रजी प्रश्नांचे हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषांतील अनुवाद अत्यंत किचकट असल्याने आकलनास वेळ लागत असल्याच्या उमेदवारांच्या तक्रारी होत्या. यावर केंद्र सरकारने हे स्वरूप रद्द केले नाही. परंतु, या प्रश्नासाठी असलेले गुण गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे जाहीर केले होते.