आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama\'s Speech In Siri Fort

धार्मिक फाटाफूट टाळली तरच भारताची वेगाने प्रगती, राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- धर्माच्या नावावर होणारी विभागणी टाळली गेली तर भारत निश्चितपणे वेगाने प्रगती करील, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या समारोपप्रसंगी दिला. भारत अमेरिकेचा भक्कम आणि उत्तम सहकारी आहे. दोन्ही देश भविष्यातील आव्हानांचा एकत्रितपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला.
सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये त्यांनी अमेरिकन शैलीत टाउन हॉल मीटिंग घेतली. दोन हजार लोक या वेळी उपस्थित होते. ओबामा यांच्याशिवाय एकही भारतीय नेता मंचावर नव्हता. ओबामांचे ३५ मिनिटांचे भाषण जोशपूर्ण होते. त्यांनी भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ने केली तर ‘जय हिंद’ने शेवट केला. ओबामा यांनी शाहरुख खान, मिल्खा सिंग, एम. सी. मेरी कोम आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचाही उल्लेख केला. भारताला सर्व धर्मांतील लोकांचा अभिमान आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री फडणवीस भेटले
राष्ट्रपती भवनात सोमवारी झालेल्या "एट होम' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृतासह सहभाग घेतला. फडणवीस यांनी या प्रसंगी बराक ओबामांची भेट घेऊन त्यांच्याशी वार्तालाप केला.

कुठल्या मुद्द्यावर काय म्हणाले ओबामा
धर्माबाबत : सर्व धर्म एकाच वृक्षाची फुले आहेत, असे महात्मा गांधी म्हणत होते. भारत व अमेरिकेत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, ज्यू, बौद्ध, जैन राहतात. भारतीय घटनेतील कलम २५ सर्वांना धर्मपालन व प्रचाराचा अधिकार देते. धार्मिक श्रद्धेच्या आधारावर विभागणी न झाल्यास भारताची प्रगती निश्चित आहे. समाजाची विभागणी करणाऱ्यांपासून आम्ही सावध राहायला हवे.
विकासात मदत : लोकांचे आरोग्य, पृथ्वीचे सौंदर्य राखण्यात मदत करू. केरळच्या बॅकवॉटरपासून गंगेपर्यंत. अणुकरारामुळे जास्त वीज मिळाल्यास रोजगार वाढेल. रस्ते, विमानतळ, बंदरे, स्मार्ट सिटी विकासात सहकार्य करू.
मुले रात्री अभ्यास करू शकतील. यंत्रांच्या मदतीने शेतकरी उत्पादन वाढवू शकतील.
लोकशाहीबाबत : जगातील सर्वांत जुनी व सर्वांत मोठी लोकशाही एकत्रित आली तर जग सुरक्षित राहील. माझे आजोबा केनियात ब्रिटिश लष्करात स्वयंपाकी होते. माझा जन्म झाला तेव्हा माझ्यासारखे दिसणारे मतदानही करू शकत नव्हते. पण आम्ही अशा देशांमधील आहोत जेथे स्वयंपाक्याचा नातू अध्यक्ष होऊ शकतो आणि एका चहावाल्याचा मुलगाही पंतप्रधान बनू शकतो.
बेस्ट पार्टनर : इतिहास, भाषा वेगळ्या असू देत, आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. स्वातंत्र्य मिळवून आम्ही घटना केली. मंगळ, चंद्रावर जाणाऱ्यांत आम्ही आहोत. अमेरिकेत ३० लाख भारतीय आहेत.आम्ही भारताचे ‘बेस्ट पार्टनर’ बनू शकतो.
मुलींचे हक्क : महिलांना समान संधी देण्याच्या दिशेने आमचा प्रयत्न असतो. मला दोन मुली आहेत. भारतीय सैन्यात नारीशक्तीचे प्रदर्शन ही माझ्यासाठी दौ-यांतील महत्त्वाची बाब ठरली. यशस्वी महिलाच यशस्वी राष्ट्रनिर्मिती करतील.
विशेषत्वाने मला सलामी देणाऱ्या तुकडीचे नेतृत्व करणारी अधिकारी (पूजा ठाकूर). ही अभिमानाची बाब आहे.

हसवलेही : परेडमध्ये रॉयल एनफील्डवरील डेअर डेव्हिल्स पाहिले. ते अद्भुतच होते. सिक्रेट सर्व्हिसचे लोक मला दुचाकीवर बसू देत नाहीत. गेल्या वेळी मी मुंबईत दिवाळी साजरी केली. भांगडाही केला होता. यावेळी तसे करता आले नाही.
‘नमस्ते’ने सुरुवात,‘जय हिंद’ने समारोप
ओबामांच्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ने झाली. त्यानंतर प्रजासत्ताक दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलावल्याबद्दल ‘धन्यवाद’ दिले. त्यांनी ‘जय हिंद’ने भाषणाचा समारोप केला.
ताज भेटीला पुन्हा येऊ
दौ-यात अंतिम क्षणी बदल झाल्याने ओबामांना ताजमहालाचे दर्शन झाले नाही. मिशेल यांनी मात्र आपण पुन्हा भारतात येऊन ताजमहाल पाहू, असे मंगळवारी सांगितले. ताजचे दर्शन न झाल्याने निराश आहात का, या प्रश्नावर मिशेल म्हणाल्या, ‘होय. निराश आहे. पण मी पुन्हा येईन.’