आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळत ठेवाल तर खबरदार; अमेरिकी मुत्सद्द्याला बोलावून भारत सरकारने खडसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेने भाजपची हेरगिरी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी अमेरिकेच्या एका मुत्सद्द्याला बोलावून घेतले आणि भविष्यात अशा प्रकारची हेरगिरी होता कामा नये, अशी समज दिली.

अमेरिकेचे सिनेटर जॉन मॅक्केन यांनी नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा केली, त्याच वेळी भारताने अमेरिकेला ही समज दिली, हे विशेष. भारतातील कोणतीही संघटना किंवा व्यक्तीच्या खासगीपणात ढवळाढवळ भारत कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी अमेरिकेने घ्यावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी मुत्सद्द्याला बजावले.

परंतु परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून घेऊन समज दिलेला अमेरिकी मुत्सद्दी नेमका कोण होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही. नॅन्सी पॉवेल यांना अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर कॅथलीन स्टीफन्स या सध्या भारतातील अमेरिकेच्या हंगामी राजदूत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हेही लवकरच भारत भेटीवर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौर्‍यातही हा मुद्दा भारताकडून लावून धरला जाण्याची शक्यता आहे.

असे आहे प्रकरण
फुटलेल्या गोपनीय दस्तऐवजांच्या आधारे वॉशिग्ंटन पोस्टने हेरगिरीचे वृत्त दिले होते. अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा संस्था अर्थात एनएसएला अमेरिकेतील न्यायालयाने 2010 मध्ये भाजपची हेरगिरी करण्याची परवानगी दिली होती, असे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. अन्य देशातील राजकीय पक्षांवर पाळत ठेवण्याची परवानगीही एनएसएला देण्यात आली होती. या गौप्यस्फोटानंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी हे प्रकरण अमेरिकेकडे लावून धरण्याचा आग्रह सरकारकडे धरला होता.

सुषमांना भेटले मॅक्केन
अमेरिकी सिनेटर जॉन मॅक्केन यांनी साऊथ ब्लॉकमधील परराष्ट्र मंत्रालयात सुषमा स्वराज यांची भेट घेतली. उभयतांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. सुषमांनी मॅक्केन यांच्याकडेही हेरगिरीचा मुद्दा लावून धरल्याचे सांगण्यात येते. सुषमांच्या भेटीनंतर मॅक्केन माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणार होते, पण त्यांनी ते टाळले. हेरगिरीचे प्रकरण हेच त्याचे कारण असावे, असा अंदाज बांधला जात आहे.

(फोटो - अमेरिकी सिनेटर जॉन मॅक्केन यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.)