नवी दिल्ली - प्रख्यात सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे गहाळ झालेले सरोद सापडले आहे. याची माहिती त्यांनी स्वतः
ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे. ब्रिटिश एअरवेज लवकरच त्यांचे सरोद त्यांना सुपूर्द करणार आहे.
उस्ताद अमजद अली खान यांना 45 वर्षांपासून साथ देणारे सरोद ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून शनिवारी रात्री गहाळ झाले होते. लंडन-दिल्ली प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. हीथ्रो विमानतळावर बॅगेजच्या यंत्रणेत निर्माण होणार्या बिघाडामुळे हा प्रकार झाल्याचा कंपनीचा अंदाज आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात लंडनमध्ये 21 जून रोजी अमजद अली यांची मैफल झाली. तेथून ते 28 जूनला परतले. दिल्लीत आल्यावर सरोद गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. विमान कर्मचार्यांनी चार-पाच तास शोधाशोध केली, मात्र सरोद सापडले नाही. पुढच्या विमानातून ते पाठवले जाईल, असे कर्मचार्यांना वाटत होते.
भरपाई नको, वाद्यच हवे : या प्रकरणी एअरवेजविरुद्ध अमजद अली यांनी तक्रार दिली होती. यापोटी कोणतीही भरपाई स्वीकारणार नाही. सरोद परत मिळावे, असा त्यांचा आग्रह होता आणि तो पूर्ण झाला आहे.
(छायाचित्र - न्युयॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियममध्ये आयोजित कार्यक्रमात अमजद अली खान.)