आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Devestation Rescue Work Completed, But 170 Villages Not Gets Food

उत्तराखंडमधील महाप्रलयाचे बचावकार्य संपले, मात्र 170 गावांची अन्नान्न दशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - देवभूमी उत्तराखंडमधील बचावाचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी बद्रीनाथमधून शेवटच्या 150 लोकांना सुरक्षित काढण्यात आले. महाप्रलयाचा तडाखा बसलेल्या 170 गावांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचाही पुरवठा होईना झाला आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. या परिसरातील रस्ते पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत.


रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदार खोरे परिसरातील 170 गावांपर्यंत पोहोचण्याचे सर्व रस्ते पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे तेथील लोकांना अन्नपाण्याच्या पुरवठा होत नसल्यामुळे त्यांची अन्नान्न दशा होत आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री महामार्ग आठ ठिकाणी बंद आहे, तर यमुनोत्री महामार्ग हनुमान टेकडीपासून यमुनोत्रीपर्यंत बंद आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने उत्तराखंडमध्ये बेपत्ता लोकांची संख्या 11 हजार असल्याचे जाहीर केले आहे.


इस्रोने 16 तास आधीच दिला होता ढगफुटीचा इशारा
उत्तराखंड सरकारचा खोटारडेपणा स्पष्ट होऊ लागला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 16 तास आधीच ढगफुटीचा इशारा उत्तराखंड सरकार आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्राधिकरणाला दिला होता. मोसडॅक या इस्रोच्या हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या 11 शहरे व परिसराची नावेही दिली होती.


मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेच नाहीत
मंगळवारी खराब हवामानामुळे केदारनाथमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. 200 लोकांचे वैद्यकीय पथक मदतीसाठी केदारनाथला पाठवण्यात आल्याचे पोलिस महासंचालक सत्यव्रत बन्सल यांनी सांगितले. केदारनाथमध्ये 65 मृतदेह पडून आहेत.


उत्तर प्रदेशात पूरस्थिती गंभीर
उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे 12 जिल्ह्यांतील 570 गावांना पुराचा धोका वाढला आहे. शारदा, घागरा, कुनो, बुढी राप्ती इत्यादी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. मुजफ्फरनगरमधील 77 गावांना पुराने वेढले आहे.