आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vajpayee Was Unhappy Over Gujarat Riots Handling

गुजरात दंगलीमुळे वाजपेयी व्यथित होते, रॉच्या माजी प्रमुखांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरात दंगलीनंतर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी खूप व्यथित झाले होते. दंगल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले होते, असा दावा भारताची प्रमुख इंटेलिजेंस एजेंसी असलेल्या रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलाट यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
काय म्हटले रॉच्या प्रमुखांनी :
दुलाट म्हणाले, वर्ष 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर वाजपेयी यांच्यासोबत आपली चर्चा झाली. यात त्यांनी वर्ष 2002 च्या दंगलीचा उल्लेख केला. झाल्या प्रकाराने ते खूप दु:खी झाल्याचे त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. त्यांनी मान्य केले होते की गुजरात दंगल ही एक मोठी चूक आहे. दंगल परिस्थिती हातळताना सरकारकडून काही चुका झाल्याचेही वाजपेयी यांनी सांगितले. दुलाट यांचे 'काश्मीर : द वाजपेयी इयर्स' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. यात त्यांनी वाजपेयी यांच्या शासनकाळाचा उल्लेख केला आहे.

प्रिंसिपल सेक्रेटरी ब्रजेश मिश्रा चालवत होते सरकार
दुलाट यांच्या दाव्यानुसार, वाजपेयी आणि अडवाणी यांचे संबंध अत्यंत चांगले होते. पण, वाजपेयी यांचे प्रिंसिपल सेक्रेटरी ब्रजेश मिश्रा यांना मिळणाऱ्या महत्त्वामुळे अडवाणी खूश नव्हते. दुलाट यांच्या म्हणण्यानुसार, एक प्रकारे ब्रजेश मिश्राच सरकार चालवत होते. ते वरकरणी शांत जरी असले खूप कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. अडवाणी यांना वाटत होते की प्रिंसिपल सेक्रेटरी यांना उप-पंतप्रधानापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. वाजपेयी आणि त्यांच्यात हाच मुख्य मुद्दा होता, असा दावाही दुलाट यांनी केला आहे.

दाऊद इब्राहीमच्या मुद्दयामुळे फिस्कटली आग्रा चर्चा :
दुलाट यांनी सांगितले, वर्ष 2001 मध्ये वाजपेयी आणि पाकिस्थानचे तत्कालीन प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासोबत आग्रा येथे दोन्ही देशातील काही महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा झाली. चर्चेच्या पूर्वरात्रीच अडवाणी हे मुशर्रफ यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याकडे दाऊद इब्राहीमला भारताकडे सोपवण्याची मागणी केली. त्यावर आग्रा बैठकीत चर्चा केली जाईल, असे मुशर्रफ यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी बैठक चांगल्या वातावणात सुरू झाली नाही. वाजपेयी यांच्यावर खूप दबाव होता. जेव्हा या बाबत मी ब्रजेश मिश्रा यांना सरळ विचारले की चर्चा का फिस्कटली त्यावर त्यांनी काहीच थेट उत्तर दिले नाही. केवळ होता-होता राहिले, असे मोघम उत्तर दिले.

विमान अपहरण प्रकरणाचीही योग्य हाताळणी नाही
वर्ष 1999 मध्ये आयसी-814 या विमानाचे अपहरण झाले होते. पण, हे प्रकरण योग्यरीत्या हाताळल्या गेले नाही, असा आरोपही दुलाट यांनी केला. ते म्हणाले, विमान अमृतसरच्या बाहेर निघू नये, असेच सर्वांना वाटत होते. पण, क्रायसीस ग्रुपने या प्रकाराला योग्य प्रकारे हाताळले नाही. केंद्र सरकारने आतंकवाद्यांची सुटका करण्याचा जो निर्णय घेतला होता त्यावर जम्मू काश्मिरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुला हे सुद्धा नाराज होते. परिणामी, राजीनामा देण्याच्याही ते विचारात होते.

वाजपेयींनी दिला होता उमर अब्दुला यांना उपराष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव
दुलाट यांनी सांगितले, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी मुफ्ती मोहम्मद सईद यांची वर्णी लागू नये, असे वाजपेयी यांना वाटत होते. त्यांच्या मतानुसार, सईद यांची मुलगी महबुबा मुफ्ती यांचे संबंध हिज्बुल मुजाहिदीन या आंतकवादी संघटनेसोबत आहेत. त्यामुळे सईद यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विचाराला सोनिया गांधी यांनी बदलावे, असे त्यांना वाटत होते. शिवाय त्यांनी फारुख अब्दुला यांना मुख्यमंत्रीपदाचा तर उमर यांना उपराष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव दिला होता. त्यांची इच्छा होती की, उमर अब्दुला यांच्या जागेवर फारुख यांनी काश्मीरचे मुख्यमंत्री व्हावे; कारण ते त्यांना तरुण नेतृत्व मानत होते. ब्रजेश मिश्रा यांनी वाजपेयी यांच्या सांगण्यानुसार, फारुख अब्दुला यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव मांडला होता. पण, फारुख यांना वाटत होते की केंद्र सरकार त्यांच्यावर भरोसा करत नाही.