आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता परिचारिकाही करणार उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशभरातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये लवकरच प्रथमोपचारांची जबाबदारी परिचारिकांवर सोपवली जाणार असून केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिचारिकांसाठी लवकरच एक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात या नव्या प्रस्तावाचा आढावा घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली.

गेल्या आठवड्यात गुलाम नबी आझाद यांनी मंत्रालयाशी संबंधित अधिकारी व तज्ज्ञांची बैठक घेतली. या विषयाशी संबंधित एका अधिका-याने सांगितले की, पाश्चात्त्य देशांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किरकोळ आजारांवर उपचारांची जबाबदारी परिचारिकांवरच असते. अशीच व्यवस्था भारतातही लागू करण्यावर एकमत झाले आहे.

सध्या कार्यरत परिचारिकांना सर्वसाधारण आजारांवर उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच एक अभ्यासक्रम सुरू करण्यावरही एकमत झाले आहे. गंभीर आजार आणि शस्त्रक्रियेसारख्या गुंतागुंतीच्या उपचारांसाठीच डॉक्टरांना पाचारण केले जाईल.


डॉक्टरांना पर्याय कशासाठी?
देशात सध्या फक्त 6.50 लाख डॉक्टर आहेत. त्यानुसार दर 2 हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर असे हे प्रमाण आहे. तथापि अमेरिका व इंग्लंडमध्ये दर दोन हजार रुग्णांसाठी पाच डॉक्टर आहेत. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सुमारे 76 टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. त्याचप्रमाणे सुमारे 85 टक्के स्पेशालिस्ट डॉक्टरांचीही उणीव भासते आहे.

रुग्णांना कसा मिळेल लाभ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात सुमारे 11.20 लाख परिचारिका आहेत. राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत 2012 पर्यंत बहुतांश प्राथमिक, सार्वजनिक व उपआरोग्य केंद्रांमध्ये किमान एक परिचारिका नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना किरकोळ आजारांवर लवकर उपचार मिळतील.

ग्रामीण डॉक्टरांसाठी कोर्स
ग्रामीण भागात नागरिकांवर उपचारासाठी वेगळा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्याची जबाबदारी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनवर (एनबीई)सोपवली आहे. याआधी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआयई) ग्रामीण डॉक्टरांसाठी अभ्यासक्रम चालवण्यास नकार दिला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. विश्वास मेहता यांनी सांगितले की, दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांच्या नियुक्तीचे अनेक प्रयत्न करूनही बहुतांश आरोग्य केंद्रांना डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ग्रामीण डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असतील ग्रामीण डॉक्टर

> या डॉक्टरांना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) म्हटले जाईल.
> अभ्यासक्रमाचे नाव बीएससी (कम्युनिटी हेल्थ) असेल.
> तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर सहा महिन्यांच्या इंटर्नशिपचा प्रस्ताव.
> हे डॉक्टर उपकेंद्रातच तैनात असतील व प्राथमिक उपचार करू शकतील
> त्यांना औषधे प्रिस्क्राइब करण्याचा, गंभीर आजारांवर उपचार करण्याचा अधिकार नसेल.