आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Communist Party Of India Leader AB Bardhan Dies At 92

भाकपचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन यांचे दिल्लीत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्धेंदू भूषण ऊर्फ ए. बी. बर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा अशोक आणि मुलगी अलका असा परिवार आहे.
अर्धांगवायूच्या झटक्यामुळे बर्धन यांना ७ डिसेंबरला जी. बी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छ‌्वासावर ठेवण्यात आले होते. ब्रेन हॅमरेजमुळे शनिवारी रात्री ८.२० वाजता त्यांचे निधन झाले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

राजकीय कारकीर्द : २४ सप्टेंबर १९२४ रोजी जन्मलेले बर्धन कामगार आंदोलन आणि देशातील डाव्या चळवळीतील प्रमुख नेते होते. १९५७ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. १९७० च्या दशकातील ऐतिहासिक कामगार आंदोलनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस झाले होते. १९९० च्या दशकात ते राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले आणि भाकपचे उपसरचिटणीस झाले. १९९० च्या दशकात आघाडी सरकार स्थापन करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९९६ मध्ये ते भाकपचे सरचिटणीस झाले. हे पद त्यांनी २०१२ पर्यंत भूषवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी बर्धन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.