नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. मात्र, सरकारचे प्रमुख या नात्याने प्रशंसेसोबत आरोपाची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली पाहिजे, असे मत निवृत्त नियंत्रक व महालेखापाल (कॅग) विनोद रॉय यांनी व्यक्त केले. रॉय यांच्या "नॉट जस्ट अकाउंटंट' या पुस्तकावरून वादंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी
आपली भूिमका मांडली.
काँग्रेस नेते रॉय यांच्यावर निशाणा साधत आहेत, तर भाजप नेत्यांना यूपीए सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली आहे. कोळसा लिलाव प्रक्रियेतील काही गैरप्रकार लक्षात आणून दिल्यानंतर सिंग यांनी कारवाईसाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दलही त्यांना श्रेय जाते. पंतप्रधान सरकारचे प्रमुख आहेत. कॉमनवेल्थ गेम्ससारख्या अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग नव्हता. मात्र, सरकारचे प्रमुख म्हणून प्रशंसा,आरोप स्वीकारावेत.
संघाच्या कामगिरीची जबाबदारी कर्णधारावर
आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक उदाहरण दिले. आपला िक्रकेट संघ इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेला. यामध्ये कसोटी सामन्यात खूप ढिसाळ कामगिरी झाली. यामध्ये संघाच्या कर्णधारावर आरोप होणार नाहीत काय? बरेच खेळाडू अपयशी ठरले असतील, शेवटी जबाबदारी कर्णधारावर येणार नाही काय? समजा मी सध्या कॅग आहे आणि माझ्या कार्यालयात काही गैरप्रकार झाला तर त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही काय, असा सवाल त्यांनी केला.