आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी : भाजप ‘घोषणापत्रा’ऐवजी ‘दृष्टिपत्र’ जाहीर करणार, दिल्लीत धुमशान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा संपताच दिल्लीतील वातावरण तापू लागले आहे. भाजपने निवडणूक रणनीती बदलली असून ‘घोषणापत्रा’ऐवजी दृष्टिपत्र जाहीर करणार आहे. ‘आप’ला घेरण्यासाठी दररोज पाच प्रश्न विचारण्यासही गुरुवारपासून सुरुवात केली आहे. आपने त्याची खिल्ली उडवत ‘खोदा पहाड, निकला चुहा’ म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी सात फेब्रुवारीला मतदान होत आहे. सर्वेक्षणात पिछाडीवर असलेल्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. १२० खासदार, कॅबिनेट मंत्र्यांबरोबरच सर्वच राज्यांतील पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली स्वत:च दिल्ली निवडणूक व्यवस्थापन पाहणार, असे या बैठकीत ठरले आहे. त्यानंतर भाजपने ‘आप’ला पाच प्रश्न विचारले. काँग्रेसने ‘यू- टर्न’ म्हणून विचारलेले प्रश्नच भाजपनेही उपस्थित केले आहेत.
‘आप’ला विचारलेल्या प्रश्नांत भाजपकडून जुन्याच कढीला ऊत
1. दिल्लीतील सत्तेसाठी ‘आप’ने तत्त्वांशी तडजोड करून काँग्रेसचा पाठिंबा का घेतला?
2. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर कारवाईच्या आश्वासनाचेे काय झाले?
3. व्हीआयपी सुरक्षा, बंगल्याचा फायदा न घेण्याचे आश्वासन दिले होते, ते पाळले का नाही?
4. केजरीवाल शपथ घेण्यासाठी मेट्रोने गेले होते पण नंतर एसयूव्ही का वापरली?
5. खासगी जेटमध्ये प्रवास करणे माझ्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे केजरीवाल सांगत होते तर मग खासगी जेटने प्रवास का केला?
मोदींनी १५ लाख रुपये जमा केले नाहीत पण १० लाखांचा सूट घातला : राहुल
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी निवडणुकीच्या वेळी दिले होते. ते पैसे जमा तर केलेच नाहीत, पण स्वत: मात्र १० लाखांचा सूट घालत आहेत, असे राहुल म्हणाले. मोदी गरिबांच्या गप्पा तर मारतात,पण उद्योगपतींचेच हित पाहतात. भाजपने दिल्लीचा विश्वासघात केला आहे. युवकांना रोजगार देण्याऐवजी त्यांच्या हातात झाडू दिल्याचे राहुल म्हणाले.

‘आप’चे उत्तर : अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या प्रश्नांची थेट उत्तरे तर दिली नाहीत, मात्र ते म्हणाले की, ‘पडद्यामागून प्रश्न का विचारत आहात? एका मंचावर येऊन चर्चा करायला का घाबरत आहात?’ तत्पूर्वी आपचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, ‘काही मोठे प्रश्न असतील असे वाटले होते. पण भाजपने जुनेच प्रश्न विचारले. खोदा पहाड, निकला चुहा. भाजपची घबराट त्यातून स्पष्ट दिसत आहे.’