नवी दिल्ली - भारतीय उद्योग क्षेत्रावर आपली पकड मजबूत करण्यासाठी फोक्सवॅगन आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्या भारत आणि इतर विकसनशील देशांसाठी छोट्या गाड्या तयार करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही कंपन्यांमधील अधिकाऱ्यांत या विषयावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्च महिन्यात जीनिव्हा इथे होणाऱ्या वाहन प्रदर्शनात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर फोक्सवॅगनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नसले तरी भारतासारख्या बाजारात आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी कंपनी संभावित भागीदारांसोबत चर्चा करत आहे.
तर अशा प्रकारच्या सामंजस्य करारासाठी विविध कंपन्यांसोबत नेहमीच चर्चा सुरू असतात, असे मत टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या घोषणा करण्यासारखी कोणतीच माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक शक्यतांवर चर्चा सुरू आहेत. यामध्ये तांत्रिक सहकार्यासोबत एकत्रित उपक्रमाच्या माध्यमातून प्रकल्प सुरू करण्यापर्यंत चर्चेत विषय घेण्यात आले आहेत.
जीनिव्हामध्ये सोबत पुढे जाण्याच्या दिशेने निश्चित काही ठरण्याची शक्यता आहे. जिनेव्हा येथील प्रदर्शनामध्ये टाटा मोटर्स आपली स्पोर्ट््स कार दाखल करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
टाटा मोटर्स सहा प्रकारची वाहने बनवणारी भारतातील चौथी मोठी कंपनी असून यासाठी फक्त दोन प्रकारच्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार कंपनी करत आहे. विविध प्रकारची वाहने बनवण्यासाठी खर्चही जास्त लागतो.
याआधी कंपनीने २००१ मध्ये प्युजो कंपनीसोबत करार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात यश आले नाही. २००६ मध्ये टाटांच्या डीलर नेटवर्कसोबत फियाट कार विक्री करण्याचा करार झाला होता. मात्र, २०१३ मध्ये फियाटने स्वतंत्र विक्री करण्याचा निर्णय घेतला.
महागडे तंत्रज्ञान
फोक्सवॅगन कंपनीला त्यांच्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या कार खूपच महागात पडतात. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त कारशी कंपनीला व्यावसायिक लढाई करावी लागत आहे. महागड्या तंत्रज्ञानामुळे फोक्सवॅगनच्या कारचे दर वाढलेले आहेत.
याचा फायदा टाटा मोटर्सला मिळण्याची शक्यता आहे. या आधी कंपनीने जपानच्या सुझुकी मोटर्ससोबत छोट्या कार बनवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर या दोन्ही कंपन्या स्वतंत्र झाल्या होत्या.