आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voters Lured By Money Sent In Bank Accounts During Polls: EC

नामी शक्कल लढवून वाटले मतदारांना प्रचंड पैसे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटद्वारे (आरटीजीएस) बॅँकेत निधीचे हस्तांतर करणे आणि कारच्या बोनेटमध्ये नोटांचे बंडल दडवून ठेवणे यांसारख्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काही पावले उचलली होती. त्या वेळी ही बाब उघडकीस आली. महासंचालक पी. के. दाश यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या खर्च नियंत्रण विभागाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत 313 कोटी रुपये आणि सव्वादोन कोटी रुपये किमतीची दारू जप्त केली. त्याशिवाय मतदारांना लाच देणारी अवैध कागदपत्रेही जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत खर्चाच्या र्मयादेवर फेरविचार करावा, अशी मागणी झाली होती. महागाईचा दर, मतदारांच्या संख्येतील वाढ, तंत्रज्ञानाच्या तंत्रात झालेल्या बदलामुळे प्रचाराच्या पद्धतीत झालेले बदल लक्षात घेऊन पूर्वीच्या 40 लाखांच्या र्मयादेत वाढ करून ती 70 लाख करण्यात आली, हे दाश यांनी निदर्शनास आणून दिले.
खर्चातही लपवाछपवी
लोकसभेच्या उमेदवाराला खर्च करण्याची र्मयादा 70 लाख रुपयांपर्यंत तर विधानसभेच्या उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय योग्य आहे. ही र्मयादा पुरेशी आहे, अशी टिप्पणी दाश यांनी केली. निवडणूक पार पडल्यानंतर 80 टक्के उमेदवार आपल्या निवडणूक खर्चात निश्चित केलेल्या रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत दाखवतात, असे आढळले आहे.

आव्हान खडतर
भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन ‘रोख अर्थव्यवस्था’ असे होत असल्याने निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखणे हे खडतर आव्हान होते. मात्र, तो रोखण्यासाठी गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्थांना एकत्रित करण्याचे पाऊल उचलण्यात आल्याने आमचे उद्दिष्ट साध्य झाले. - पी. के. दाश, महासंचालक, निवडणूक आयोगाचा खर्च नियंत्रण विभाग.

अशी लढवली शक्कल
गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ते नेहमी आपल्या पद्धतीत बदल करत होते. वाहने तपासली जातात हे माहीत असल्याने काही जणांनी वाहनांच्या बोनेटमध्ये रोख रक्कम ठेवली. जेव्हा या नोटा जप्त करण्यात आल्या तेव्हा त्या नोटा जळालेल्या अवस्थेत होत्या. आयोगाच्या पथकांना अर्धवट जळालेल्या नोटा आढळल्या. बसच्या टपावर पाच बॅगांमध्ये ठेवलेले 8.31 कोटी रुपयेही जप्त करण्यात आले. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, आरटीजीएस सिस्टिमद्वारे किमान 2 लाख रुपयांची रक्कम पाठवता येते.