आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर घोटाळ्यात तीन शहरांमध्ये छापे, हैदराबादमध्ये १० ठिकाणी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नव्याने कारवाई सुरू करताना दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत या घोटाळ्याशी संबंधित कंपन्यांच्या १० परिसरांवर छापे टाकले. या कंपन्यांनी विदेशी कंपन्यांत ठेवलेले ८६ कोटींचे शेअर्स गोठवण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घोटाळ्याशी संबंधित कंपन्यांच्या परिसरात टाकलेल्या या छाप्यांत अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यातील (पीएमएलए) तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कंपन्यांनी दुबई, मॉरिशस आणि सिंगापूर येथील कंपन्यांत गुंतवणूक केली असून त्यांचे ८६.०७ कोटी रुपये किमतीचे शेअर्स गोठवण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाने अलीकडेच व्हीव्हीआयपी घोटाळा प्रकरणात नवे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ब्रिटिश नागरिक आणि या खरेदी करारातील मध्यस्थ क्रिस्टियन मिशेल जेम्स याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याला २२५ कोटी रुपयांची लाच मिळाल्याचा आरोप आहे. ईडीने २०१४ मध्ये या प्रकरणात पीएमएलएनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यात २१ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख त्यागी यांचाही समावेश आहे.

ईडीने या प्रकरणी दिल्लीतील व्यावसायिक गौतम खेतानला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात चंदिगड येथील एअरोमॅट्रिक्स या कंपनीने आर्थिक व्यवहार केले होते. खेतान या कंपनीच्या संचालक मंडळावर होता, असे ईडीने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
भारताने फेनमेकॅनिका या कंपनीची ब्रिटिश भागीदार ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून १२ एडब्ल्यू-१०१ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता, पण करारातील तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या तसेच हा करार व्हावा यासाठी ४२३ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून भारताने १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द केला होता. या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही देशांना लेटर्स रोगेटरी (न्यायालयीन विनंती) जारी केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...