आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • We Will Create A Transparent Government System Using Information Technology; Fadnavis

माहिती तंत्रज्ञान माध्यमातून पारदर्शक शासन व्यवस्था निर्माण करू मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारच्या विविध योजना व सार्वजनिक सेवा जनतेपर्यंत तत्काळ पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार माहिती तंत्रज्ञानाचा वापर करीत असून त्यामुळे एक जबाबदार  पारदर्शक आणि विश्वासार्ह शासन व्यवस्था निर्माण हाेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. दिल्लीतील प्रगती मैदानावर  ओरॅकल ओपन वर्ल्ड आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बाेलत हाेते.   

जनतेला सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय कल्पक रीतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्मेशन क्षेत्रात दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा साक्षात्कार घडवल्याबद्दल ओरॅकलच्या सीईओ सफ्रा काट्झ यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.   
 
मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व त्याद्वारे जनतेपर्यंत विविध सेवा पोहोचवण्याचे काम यासाठी राज्य शासन एक महत्त्वाचा दुवा आहे. १००  वर्षांत हा देश जे करू शकला नाही ते माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केवळ १० वर्षांत साध्य करता येईल आणि देशाला शक्तिमान बनवता येईल.  महानेट आॅप्टिक फायबरद्वारे महाराष्ट्र सरकारने माहितीचा सुपर हायवे तयार केला आहे. आॅप्टिक फायबर नेटवर्कने आजवर १४ हजार ग्रामपंचायतींना चांगल्या कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात आले आहे. 

सरकारतर्फे ३७० सेवा सध्या आॅनलाइन पुरवल्या जातात. इंटरनेटवर ‘आपले सरकार’ नावाचे महाराष्ट्राचे पोर्टल अगोदरच कार्यरत आहे. याखेरीज राज्य सरकार लवकरच माहिती तंत्रज्ञानाचा एक असा प्लॅटफॉर्म तयार करीत आहे की  सरकारचे वेगवेगळे विभाग एकाच कामासाठी दस्तऐवज आणि प्रमाणपत्रे कोणत्याही नागरिकाकडे सतत मागणार नाहीत.’
बातम्या आणखी आहेत...