नवी दिल्ली - भारत सरकारने बुधवारी चीनच्या राजदुतांना पाचारण करुन लडाखमध्ये चीनी सैनिक काय करत आहे, याची विचारणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे राजदूत ली युचेंग यांना चीनी सैनिकांच्या घुसखोरीबद्दल विचारणा केली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले, 'सीमेवर गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तणावावर भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर त्यासंबंधी बातचीत झाली आहे. त्याचा सार असा आहे, की कुटनीती सुरु आहे. ते शांतपणे त्यांचे काम करत आहेत.'
चीनकडून फ्लॅग मिटींगचा प्रस्ताव आला आहे, त्याच्या दुसर्याच दिवशी चीनचे राजदूत ली यांनी भारतीय अधिकार्यांची भेट घेतली आहे. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून चीन आणि भारतादरम्यान दोन फ्लॅग मिटींग झाल्या आहेत. मात्र, त्यातून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. लडाखमध्ये भारतीय हद्दीत काही दिवसांपासून 1000 चीनी सैनिक आणि 1500 भारतीय जवान एकमेकांसमोर आहेत.