आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Is Owner Of Delhi ? , Today Voting For Assembly

दिल्ली दरबार कुणाचा?, आज विधानसभा मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता गाजवणा-या काँग्रेसला ललकारत उतरलेली आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील तिरंगी लढतीचा अंतिम सामना बुधवारी होणार आहे. अर्थात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून दिल्लीकर नवीन सरकारची सूत्रे कोणाच्या हाती देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी विकासाच्या मुद्द्यावर चौथ्यांदा विजयी होऊ, असा विश्वास दर्शवला आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या रिंगणातील चित्र एकदम पालटले. त्यामुळेच निवडणूक पूर्व काळात ‘आप’चा झालेला गाजावाजा प्रत्यक्षात उपयोगी होणार आहे की केवळ काही जागांवर आपला समाधान मानावे लागेल, ही ‘आप ’ बिती पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेची आहे. भाजपने दिल्लीतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी चांगलीच तयारी केल्याचे निवडणूक प्रचारातून दिसून आले होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या राजधानीतील विविध ठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दिग्गजांच्या सभांतून काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचे वस्रहरण देखील पाहायला मिळाले. काँग्रेसनेही सत्ता टिकवण्यासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन सभा घेऊन 75 वर्षीय मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. दरम्यान, तीन पक्षांव्यतिरिक्त बसपा (69), राष्ट्रवादी काँग्रेस (09), समाजवादी पार्टी (27) यांच्यासह अपक्ष (224) उमेदवार रिंगणात आहेत.
दीक्षितांसाठी कठीण लढत
शीला दीक्षित यांच्यासाठी ही लढत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण लढत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या प्रचार मोहिमेत ऐनवेळी बदल करून नवीन रणनिती वापरल्याचे दिसून आले होते. दिल्लीसह पाच राज्यातील निवडणूक काँग्रेससाठी लोकसभेची सेमीफायनल आहे, असे मानले जाते.
‘अँटी इन्कबन्सी’चा धोका
गेल्या दोन महिन्यात जीवनावश्यक वस्तू तसेच पालेभाज्या व फळांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे दिल्लीकर महागाईने हैराण झाला आहे. राजधानीतील काही भागात नागरिकांकडून जाहीरपणे त्याबद्दलची नाराजी आणि रोष दिसून आला आहे. जनतेचा सरकारविरोधातील हा संताप काँग्रेस सरकारला उलथवू शकतो, असा धोका राजकीय पंडितांना वाटतो.
तिन्ही पक्षांची ठळक आश्वासने
काँग्रेस
> इसीझेडचा विस्तार करून पायाभूत सुविधेवरील बोजा कमी करू.
> डबलडेकरसाठी स्वतंत्र उड्डाणपूल बांधणार. वाहतूक सुरळीत करू.
भाजप
> वर्षभरात 12 अनुदानित सिलिंडर देऊ.
> महिला सुरक्षेसाठी विशेष दल.
आप
> जनलोकपाल विधेयकाला 15 दिवसांत मंजुरी देऊ.
> 700 लिटर पाणी दरदिवशी देऊ.
तामिळनाडूत पोटनिवडणूक
बुधवारी होणा-या येरकूड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी अण्णाद्रमुक व मुख्य विरोधी पक्ष द्रमुक सज्ज झाले आहेत. ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीची चाचणी मानली जाते. संपूर्ण मतदारसंघातील 290 मतदान केंद्रे संवेदनशील मानत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार यांनी दिली.