आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाची हाक... कलाम परत या, राजशिष्टाचार बाजूला ठेवून मान्यवरांची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांना मंगळवारी सकाळी सर्व देशाने श्रद्धांजली अर्पण केली. लहान मुले, ज्येष्ठ, नेते, वैज्ञानिक अशा समाजातील सर्व घटकांचा यात समावेश होता. ‘आरआयपी कलाम’ (रिटर्न इफ पॉसिबल) या शब्दांनी सोशल मीडिया संकेतस्थळांना व्यापले होते. शिलाँगहून त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. १०, राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी जनसागर उसळला होता. येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता रामेश्वरम येथे अंतिम संस्कार करण्यात येतील. हेच त्यांचे जन्मगाव. या वेळी ६ राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना अंतिम निरोप देतील.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी तिघेही विमानतळावर दाखल झाले. एखाद्या महान व्यक्तीसाठी सर्व राजशिष्टाचारांना बाजूला ठेवण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. कॅबिनेटने ठराव मंजूर केला व श्रद्धांजलीनंतर बुधवारपर्यंत दोन्ही सदनांचे कामकाज तहकूब करण्यात आले. ‘असामान्य व्यक्तित्व असलेला तो साधा माणूस होता. त्यांच्या स्वप्नांसाठी कृतिशील होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशासाठी त्यांची स्वप्ने मोठी होती,’ या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, तामिळनाडूच्या तुतिकोरिन येथील वकील एस. पचाईमल यांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मुंडन केले. यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांच्या निधनानंतरही त्यांनी मुंडन केले होते.

आज डॉ. कलाम यांचे पार्थिव रामेश्वरमला आणणार
सकाळी ७ वाजता डॉ. कलाम यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीहून मदुराईला आणण्यात येईल. तिथून १० वाजता हेलिकॉप्टरने रामेश्वरमला आणण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्लीत डॉ. कलाम यांच्या निवासस्थानी सचिन तेंडुलकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंह व त्यांची पत्नी, भाजप अध्यक्ष अमित शहा, सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, तिन्ही सेनाप्रमुख व वायुसेनेचे ९६ वर्षीय मार्शल अर्जन सिंह यांची उपस्थिती होती.

१०, राजाजी मार्गावर मंगळवारी शोककळा होती. कलामांचे पार्थिव गाडीतून बाहेर काढताना पाहून २६ वर्षीय मोहनला अश्रू अनावर झाले. आपल्या प्रेरणास्रोताचे तिरंग्यातील पार्थिव पाहणे त्यांना असह्य झाले होते.

‘ते माझी प्रेरणा होते. ते केवळ लोकांचे राष्ट्रपती नव्हते, तर लोकांचे कवीदेखील होते. मुख कर्करोग झालेले ६२ वर्षीय प्रकाश कुलकर्णी येथे आले होते. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण आरामाचा सल्ला दिला आहे. बाहेर पडणे त्यांना वर्ज्य करूनही ते कलामांचे अंतिम दर्शन घेण्यास आले.
मला त्यांचे दर्शन घ्यायचेच होते. कुलकर्णींसोबत त्यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगीही होती.

साेशल मीडियाही हळहळला, दिवसभर विनाेदांना फाटा, श्रद्धांजली अर्पण करणा-या विविध पाेस्ट
नाशिक । तरुणांचे श्रद्धास्थान असलेले डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे नेट यूजर्सना माेठा धक्का बसला. मंगळवारी दिवसभर व्हाॅट्स अॅप अाणि फेसबुकसारख्या साेशल मीडियावर विनाेद वा करमणुकीच्या काेणत्याही पोस्ट न टाकता यूर्जसनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी प्राेफाइल फाेटाे म्हणून कलाम यांचाच फाेटाे टाकला हाेता.

कलाम यांच्या निधनाचे वृत्त कळताच अगदी कौटुंबिक ग्रुपवरही काही कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करणा-या पाेस्ट सुरू झाल्या. काहींनी कलाम यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवट्याची माहिती देतानाच मंगळवारी शाळा, काॅलेजेस अाणि सरकारी कार्यालये बंद असणार असल्याची माहिती दिली. काहींनी यावर डॉ. कलाम यांच्याच विधानाची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले हाेते की, ‘माझ्या निधनानंतर सुटी देऊ नका. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर त्या दिवशी जास्त काम करा...’ डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर जोवर अंत्यसंस्कार हाेत नाहीत, ताेपर्यंत काेणीही साेशल मीडियावर विनाेद किंवा करमणुकीचे साहित्य शेअर करू नये, अशी पाेस्टही दिवसभर फिरत हाेती. विशेष म्हणजे यूजर्स या पाेस्टनुसार अनुकरणही करीत हाेते.

सुन्न १०, राजाजी मार्ग
एरवी १०, राजाजी मार्गावर नेहमी उत्साहाने वावरणारी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांची गर्दी मंगळवारी खिन्न होती. मार्गावर शोककळा होती. कलामांचे पार्थिव गाडीतून बाहेर काढले जात असताना मुख कर्करोग झालेले ६२ वर्षीय प्रकाश कुलकर्णी येथे आले होते. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असतानाही ते कलामांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते.