नवी दिल्ली - भारत सरकारशी चर्चा करायची की फुटीरवाद्यांशी हे आधी निश्चित करा, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने याबाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. त्यानंतरच चर्चा सुरू होईल, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला बजावले आहे.
इंडिया इकॉनॉमिक परिषदेत बुधवारी जेटली म्हणाले की, पाकिस्तानशी चर्चा करण्याची, संबंध सुरळीत करण्याची भारताची तयारी आहे. मात्र काही सीमारेषा आहेत, त्यांचे उल्लंघन व्हायला नको. आम्ही चर्चेसाठी वातावरण तयार केले होते. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा निश्चित केली होती. आमचे परराष्ट्र सचिव पाकिस्तानला जाणारही होते. पण तत्पूर्वी काही तास आधीच पाकने
आपल्या उच्चायुक्त कार्यालयात फुटीरवाद्यांना बोलावले. त्यामुळे पाकने आता आपली सीमारेषा निश्चित करावी, असे वाटते. कोणाशी चर्चा करायची याचा निर्णय पाकनेच घ्यायचा आहे.
पाक समजून उमजून निर्णय घेत नाही तोपर्यंत चर्चा शक्य नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने काश्मिरी फुटीरवाद्यांना बोलावल्यानंतर भारताने गेल्या ऑगस्टमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द केली होती. परिणामी दोन देशांमधील तणाव वाढला होता.