नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संस्था इस्रोने सोमवारी
पीएसएलव्ही 23 रॉकेटच्या साहाय्याने एकाच वेळी पाच विदेशी उपग्रहांना अंतराळ कक्षेत स्थापन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीहरिकोटा येथे इंग्रजीतून भाषण केले. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी हिंदीचा आग्रह धरलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी परदेशी पाहुण्यासोबतही हिंदीतून संवाद साधण्यास पसंती दिली. त्यामुळे मोदींच्या इंग्रजी भाषणाची सोमवारपासून चर्चा सुरु आहे. मोदींनी इंग्रजीत भाषण का केले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काही राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदींनी इंग्रजीतून भाषण करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला होता. त्यामागे त्यांची राजकीय खेळी देखील आहे. मोदींचे जीवनदर्शन लिहिणारे नीलंजन मुखोपाध्याय यांनी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहिलेल्या लेखानुसार, सोमवारच्या भाषणासाठी मोदींनी मोठी तयारी केली होती आणि त्यांचे प्रयत्न कौतूकास पात्र ठरले आहेत. मोदींनी इंग्रजीत भाषण का केले याचीही दोन कारणे मुखोपाध्याय यांनी मांडली आहेत.
1 - स्वतःची प्रतिमा अधिक उजळवण्यासाठी
इंग्रजीतून भाषण करुन मोदींनी त्यांची इंग्रजी भाषेवरही पकड असल्याचे दाखवून दिले आहे. सोमवारी भाषण करतानी त्यांनी टेलिप्रॉम्पटरचाही उपयोग केला नाही. त्यांचे भाषण सुरु असताना ते वाचून सांगत आहेत असेही कधी जाणवले नाही. लोकसभी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या विरोधकांनी मोदींची इंग्रजी कच्ची असल्याची टीका केली होती. यामुळे त्यांचे समर्थक नाराज होत होते. मात्र, सोमवारी अस्खलित इंग्रजीतील मोदींच्या भाषणानंतर ते सुखावले असणार.
2- राजकीय कारण
पीएसएलव्ही 23 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर केलेल्या भाषणासाठी मोदींनी इंग्रजी भाषेची केलेली निवड ही त्यांची एक मोठी राजकीय खेळी देखील मानली जात आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सर्व मंत्र्यांना आणि त्यांच्या खात्यांना सोशल मीडियावर हिंदी भाषेचा वापर करण्याचे निर्देश दिले गेले. त्यानंतर सरकार जनतेवर हिंदीची बळजबरी करीत असल्याची टीका झाली होती. मोदींनी श्रीहरिकोटा येथून इंग्रजीत संवाद साधून केंद्र सरकार इंग्रजीचा द्वेष करत नसल्याचेच दाखवून दिले आहे. मोदींनी अशा पद्धतीने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
सबा नक्वी 'आउटलुक' मध्ये लिहितात,
मोदींची प्रतिमा उदारीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करणारे नेते अशी आहे. मोदींना माहित आहे, की बाजाराची भाषा ही इंग्रजी आहे. त्या्मुळेत पीएसएलव्ही 23 च्या लाँचींगनंतर त्यांनी इंग्रजीतून भाषण करण्याला प्राधान्य दिले. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यवहार आणि संबंध यासाठीची भाषा ही इंग्रजी आहे, हे दाखवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.
सबा लिहितात, मोदींची भाषेसंबंधीची ओढ ही जूनी आहे. फार कमी लोकांना माहिती आहे, की गुजरातमधील 12 वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जेवढे प्रोत्साहन आणि महत्त्व दिले तेवढे खचितच एखाद्या मुख्यमंत्र्याने दिले असेल.
(छायाचित्र - श्रीहरिकोटा येथून PSLV C-23 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपणानंतर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)