आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Summon Sri Lankan High Commissioner: Sushma Swaraj

श्रीलंकेच्या उच्चयुक्तांकडे खुलासा मागणार : सुषमा स्वराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासंदर्भात श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह लेख प्रसारित करण्यात आला होता. याविरुद्ध अण्णाद्रमुकच्या संतप्त खासदारांनी सोमवारी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर श्रीलंकेच्या उच्चायुक्तांकडे स्पष्टीकरण मागण्यात येणार असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत सांगितले.

लोकसभेत हा मुद्दा अण्णाद्रमुकचे नेतो एम. थंबी दुराई यांनी उचलून धरला. जयललिता यांनी पंतप्रधानांना श्रीलंकन नौदलाच्या अरेरावी वर्तनासंबंधी अनेकदा पत्र लिहिले आहे. तामिळ मच्छीमारांच्या समस्यांविषयी वेळोवेळी केंद्राला माहिती देण्यात आली असल्याचेही थंबी दुराई या वेळी म्हणाले. अशा पत्रांचा ‘प्रेमपत्र’ असा उल्लेख संबंधित संकेतस्थळावर करण्यात आल्याबद्दल दुराई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या या कृतीवर द्रमुक खासदारांनी जहाल टिप्पणी केली. सरकारने दिलेल्या प्रतिसादावर अण्णाद्रमुक खासदारांचे समाधान झाले नाही. सर्वसंमतीने निंदाव्यंजक ठराव पास करावा, अशी मागणी त्यांनी केली. अण्णाद्रमुकच्या खासदारांनी राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या गोंधळामुळे कामकाज स्थगित करावे लागले.

एका पत्रकाराने लिहिलेल्या लेखाला श्रीलंकन संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर का स्थान द्यावे, असा प्रश्न खासदार मैत्रेयन यांनी उपस्थित केला. कच्चातिवू बेट भारताच्या ताब्यात घेण्यासंबंधीही या वेळी प्रश्न विचारण्यात आले. तामिळींपेक्षा विद्यमान सरकार श्रीलंकेचीच तळी उचलत असल्याचा आरोप अण्णाद्रमुकच्या खासदारांनी केला.

मच्छीमारांची समस्या अद्यापही दुर्लक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.अडीच कोटी श्रीलंकनांसाठी सरकार 7 कोटी तामिळींना वेठीस धरत आहे. त्यावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याचा आरोप संसदेत करण्यात आला. भारतातील एका महिला मुख्यमंत्र्याने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला प्रेमपत्र म्हणणे अशोभनीय असल्याचे मत अण्णाद्रमुकच्या खासदारांनी व्यक्त केले.

प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून राज्यसभेत चर्चा
अण्णाद्रमुकचे संतप्त खासदार घोषणाबाजी करू लागल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करुन त्यावर चर्चा झाली. सुषमा स्वराज यांनी दोन्ही सभागृहांत सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या लेखावर सरकारही आक्षेप घेत असून श्रीलंकेच्या भारतातील उच्चायुक्तांना यासंबंधी सरकार पाचारण करणार आहे. संसद भवनाच्या भावनांची जाणीव त्यांना येथे बोलावून करून दिली जाईल. हे कृत्य फार गंभीर आहे.